पावसाच्या दडीने बळीराजा चिंतेत
By Admin | Updated: August 9, 2014 01:42 IST2014-08-09T01:42:22+5:302014-08-09T01:42:22+5:30
पावसाच्या आगमनानंतर सुखावलेल्या शेतकऱ्याने पेरण्या आटोपल्या. यात काही ठिकाणी दुबार, तिबार पेरण्या झाल्या. आलेला पाऊस पुन्हा दडी मारणार नाही ...

पावसाच्या दडीने बळीराजा चिंतेत
वर्धा : पावसाच्या आगमनानंतर सुखावलेल्या शेतकऱ्याने पेरण्या आटोपल्या. यात काही ठिकाणी दुबार, तिबार पेरण्या झाल्या. आलेला पाऊस पुन्हा दडी मारणार नाही असे वाटत असताना गत १५ दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. पावसामुळे बळीराजा पुन्हा चिंतेत सापडला आहे.
जिल्ह्यात पावसाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. पाऊस आला नसल्याने अनेकांनी केवळ कपाशीची लागवड केली. जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. ज्यांच्याकडे स्प्रिकलरची सुविधा होती त्यांनी सिंचनाच्या माध्यमातून कपाशी जगविली; मात्र ज्यांच्याकडे ही सोय नव्हती त्यांनी पावसाची प्रतीक्षा करीत पेरण्या आटोपल्या. अशात पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. पाऊस आल्यावर काहींच्या पेरण्या दडपल्या तर काही शेतकऱ्यांच्या उगविल्या. आता पाऊस दडी मारणार नाही, उगविलेल्या पिकाची वाढ होईल असे वाटत असताना पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे उगविलेली पिके धोक्यात आली आहेत. पिकांची वाढच होत नसल्याने उत्पन्नाची चिंता आता बळीराजाच्या चेहऱ्यावर दिसू लागली आहे. (प्रतिनिधी)
आर्थिक टंचाईत बँकांनी कर्ज नाकरले
जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली. गत वर्षी झालेली अतिवृष्टी व यंदा निर्माण झालेली कोरड्या दुष्काळाची स्थिती यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. अशा अडचणीच्या काळात शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करण्याच्या सूचना केल्या; मात्र बँकांनी शेतकऱ्यांच्या अडचणीचा लाभ घेत त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी आम्हाला अशा सूचनाच नसल्याचे सांगितले. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत सापडला आहे.
कपाशीवर मर रोगाचे सावट
पावसाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात ज्यांच्याकडे स्प्रिकलरची सोय होती त्यांनी सिंचन करून पीक जगविले. आता पाऊस आल्याने त्यांनी स्प्रिंकलर बंद केले. मात्र सध्या वातावरणात असलेल्या उष्म्यामुळे त्यांच्या कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे स्थिती आहे. यामुळे त्यांची चिंता अधिक वाढली आहे.
श्रावण सरी येतात जातात
सध्या श्रावण सुरू आहे. श्रावणातला पाऊस एकतर सतत येतो नाही तर त्याच्या सरी कुठे येतात कुठे नाही अशी स्थिती असते. जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पावसाच्या सरी कोसळतीलच अशी स्थिती नाही. सकाळी उन्ह व दुपारून केवळ आभाळ असे चित्र जिल्ह्यात आहे. ढगावरून पावसाचे अंदाज बांधले जातात; मात्र ते अंदाजच ठरत आहेत. पावसाचा थेंही पडत नाही.
उत्पन्नाची आशा मावळली
बळीराजाने पहिली पेरणी मोडली असताना दुबार पेरणी केली. यात आलेल्या पावसाने ती उगविली. पाऊस आल्याने काही शेतकऱ्यांनी तिबार पेरणी केली. पेरणी उगविली, आता पाऊस दगा देणार नाही असे वाटत असताना पाऊस बेपत्ता झाला. अशात सोयाबीनचे पीक मोजक्या कालावधीचे आहे. त्याचा वेळ संपत आहे. यामुळे उत्पन्न होईल अथवा नाही अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे.