बळीराजा झाला पुन्हा पेरता
By Admin | Updated: July 20, 2014 00:04 IST2014-07-20T00:04:59+5:302014-07-20T00:04:59+5:30
तालुक्यात उशिरा परंतु समाधानकारक पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांनी लावण केली होती त्यांनी रात्रंदिवस एक करून उपलब्ध सिंचन व्यवस्थेवर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. अनेकांची पिके करपली.

बळीराजा झाला पुन्हा पेरता
सेलू : तालुक्यात उशिरा परंतु समाधानकारक पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांनी लावण केली होती त्यांनी रात्रंदिवस एक करून उपलब्ध सिंचन व्यवस्थेवर पिके जगविण्याचा प्रयत्न केला. अनेकांची पिके करपली. अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. या पहिल्याच पावसात उर्वरित शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची एकाच वेळी लागवड करण्याचा सपाटा लावल्याने हाताला काम नसल्यांना मजुरांना आता तुटवडा जाणवत आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत साऱ्यांचा घाम निघाला. शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. हाताला काम नसल्याने मजुरांचे हाल होते. पहिलाच पाऊस झाला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले. उशीर झाला असला तरी भविष्यात पीक कमी जास्त होईल का? याचे गणीत न लावता शेतकरी पेरता झाला आहे. शेतात सर्वत्र पेरणीच्या कामात शेतकरी-शेतमजूर व्यस्त दिसत आहे.
पाऊस यापुढे पुन्हा दगाफटका करणार तर नाही ना? अशी भीतीही शेतकऱ्यांच्या मनात आली आहे. आपले आर्थिक सर्वस्व पणाला लावून शेतकऱ्यांनी पेरणीची तजविज केली. आता दगाफटका झाला तर त्याचे आर्थिक बजेट आणखीच कोलमडणार हे पक्के आहे. सद्या सर्व दु:ख गिळून बळीराजा शेतात बी टाकून हिरवे स्वप्न पाहात आहे. यातही निसर्गाने धोका दिला तर पुन्हा त्याच्या स्वप्नाचा चुराडा झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्याच भरवशावर बाजारपेठा असल्याने व्यावसायिकांचे धंदे लंबेगार झाले आहेत. शेतकऱ्यांना शासनाची मदतही आवश्यक झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)'