अल्लीपूर : स्थानिक वर्ग एक श्रेणीतील पशुवैद्यकीय दवाखाना गत ४ महिन्यांपासून डॉक्टर नसल्याने शोभेचा ठरत आहे़ वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आपली गुरे गमवावी लागत आहेत़ प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर आॅक्टोबर महिन्यात वायगाव येथे रूजू झाले़ यामुळे येथील कार्यभार हिंगणघाट येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ़ एस़एस़ पाटील यांना सोपविण्यात आला; पण तेही येथे येत नाहीत़ यामुळे गोपालकांच्या समस्या वाढत आहेत़ डॉ़ नंदगवळी नागपूर हे अल्लीपूर येथे पहिल्या दिवशी रूजू होऊन दीर्घ वैद्यकीय रजेवर गेलेत़ यामुळे ते कधी येतील, हा प्रश्नच आहे़ यामुळे डॉ़ पाटील यांनी सिरजगाव येथील डॉ़ परसवार यांच्याकडे कार्यभार सोपविला; पण ते वेळ मिळाल्यास आठवड्यातून एखाद्या दिवशी दवाखान्यात येतात़ यामुळे पशुपालकांना उपचाराकरिता गुरे कुठे न्यावी, असा प्रश्न पडतो़ येथे २४ तास सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची गरज आहे़ पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्ष देत पूर्णवेळ डॉक्टरची नियुक्ती करावी, अशी मागणी गोपालकांनी केली आहे़(वार्ताहर)
पशुवैद्यकीय दवाखाना चार महिन्यांपासून डॉक्टरविना
By admin | Updated: January 23, 2015 01:48 IST