भाजी बाजार घाणीत
By Admin | Updated: June 19, 2015 00:21 IST2015-06-19T00:21:45+5:302015-06-19T00:21:45+5:30
प्रत्येक गावात, शहरात आठवडी बाजार भरतो. कुठे ही जागा ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद वा खासगी असते. ...

भाजी बाजार घाणीत
वर्धा : प्रत्येक गावात, शहरात आठवडी बाजार भरतो. कुठे ही जागा ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद वा खासगी असते. वर्धा शहरात बाजार ओळीत आठवडी बाजार तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर दररोज भाजी बाजार भरतो; पण भाजी बाजारात कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. यामुळे सध्या शहरातील भाजी बाजाराला घाणीने विळखा घातला आहे. यास प्रशासनासह व्यावसायिकही दोषी असून त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागतो. याकडे लक्ष देत भाजी बाजार परिसरात स्वच्छता राखणे गरजेचे झाले आहे.
शहरातील बजाज चौक स्थित कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जिल्हा स्थळ असलेल्या वर्धेचा भाजी बाजार दररोज नागरिकांच्या सेवेत असतो. बाजाराची जागा ऐसपैस असली तरी व्यवस्था पूरेसी नाही. यामुळे बाजारात रस्ते अत्यंत निमूळते असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असते. बाजाराच्या मागील बाजूलाच शिल्लक भाजीपाला टाकला जातो. यामुळे गुरांची मोठी गर्दी होते. कचऱ्याचे ढोले आहे; पण ते नाममात्र असल्याचे दिसते. पावसाळ्यात या बाजार व्यवस्थेचे तीनतेरा होतात. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे बाजाराच्या मागील बाजूस सर्वत्र चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. नाल्या तुंबल्या असून बाजार परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)