उन्हाच्या कडाक्यात भाजीपाला स्वस्त

By Admin | Updated: May 13, 2015 01:52 IST2015-05-13T01:52:49+5:302015-05-13T01:52:49+5:30

उन्हाळा सुरू होताच भाजीपाल्याचे दर कडाडतात असा ग्राहकांचा आजवरचा अनुभव आहे.

Vegetable cheap in summer | उन्हाच्या कडाक्यात भाजीपाला स्वस्त

उन्हाच्या कडाक्यात भाजीपाला स्वस्त

वर्धा: उन्हाळा सुरू होताच भाजीपाल्याचे दर कडाडतात असा ग्राहकांचा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र भाजीपाल्याची आवक वाढली असल्याने दरवर्षीच्या तुलनेत प्रत्येक भाजीचे दर १० ते १५ रुपयांनी पडले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून भाजीपाला उपलब्ध होत असल्याने अन्य जिल्ह्यातून होणारी निर्यात मंदावली. यामुळे सर्वसामान्य ग्राहक सुखावला असला तरी अवकाळी पावसाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्याचा लागवड खर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
उन्हाळा लागल्यानंतर भाजीपाला कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने पूर्वीच्या काळी स्वयंपाक घरात कडधान्याचा वापर वाढत असत. आजकाल शहरातील बाजारपेठेत भाजी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दोन्ही वेळच्या जेवणात ताज्या भाज्यांची मेजवानी असली तरी यामुळे खिशालाही झळ सोसावी लागत. ऐन उन्हाळ्यात भाज्यांचे भाव गडगडल्याने गृहिणींना ‘कशाची भाजी करायची’ ही समस्या निदान यावर्षी तरी भासणार नाही असे दिसते. मात्र भाजीपाला .उत्पादकांना अत्यंत कमी मोबदला मिळत असल्याने लागवडीचा खर्चही निघत नाही.
उन्हाळ्यात ८० रुपये किलोला मिळणारे टमाटे यंदा यावेळी २० रुपये किलोंवर आहे. इतर भाज्यांचीही स्थिती हिच आहे. नागरिकांनी दिलासा मिळाला असला तरी, शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र अश्रु तरळत आहे. खरीपाच्या हंगामाने दगा दिल्यानंतर शेतकरी रबीवर विसंबून होता. रबीतही गारपिटीसह वादळी वाऱ्याचा धोका असल्याने तत्काळ दिलासा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून भाजीपाल्याची लागवड केली. यातही गारपीट आणि वादळाचा फटका सहन करावा लागत असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. बाजारातही मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्याला मात्र चणचण भासत आहे.
वादळी वारा आणि गारपिटीने भाजीपाला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात माल विक्रीसाठी आणणे सुरू केले. दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारात विक्रीसाठी येत आहे. यासोबतच नागपूर, भंडारा येथूनही भाजीपाला येत आहे. या सर्व बाबींचा परिणाम भाजीपाल्याचे दर कमी असण्यावर झाल्याचे विक्रेते सांगतात. (स्थानिक प्रतिनिधी)
लागवड खर्चही निघण्याची शाश्वती नाही

Web Title: Vegetable cheap in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.