वरुणराजा बरसला; शेतकरी सुखावला

By Admin | Updated: September 1, 2014 00:08 IST2014-09-01T00:08:38+5:302014-09-01T00:08:38+5:30

पोळ्यानंतर वरुणराजाने शेतकऱ्यावर कृपा केली़ पावसाच्या सरींनी पिके डोलू लागली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले़ गत अनेक दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. आभाळात ढग जमायचे;

Varunaraja Barasala; The farmer has dried | वरुणराजा बरसला; शेतकरी सुखावला

वरुणराजा बरसला; शेतकरी सुखावला

आकोली : पोळ्यानंतर वरुणराजाने शेतकऱ्यावर कृपा केली़ पावसाच्या सरींनी पिके डोलू लागली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले़ गत अनेक दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. आभाळात ढग जमायचे; पण पाण्याचा थेंबही पडत नव्हता़ आभाळात गर्दी केलेले ढग शेतकऱ्याला वाकुल्या दाखवीत असल्याचाच भास होत होता; पण गत काही दिवसांत समाधानकारक पाऊस आल्याने शेतकरी सुखावला़
सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांची वाढ खुंटली होती. विहीर व मोटरपंपची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी दिवस-रात्र एक करून पिकांचे सिंचन केले तर कोरडवाहू शेतकरी मात्र गलितगात्र झाला होता. चार-आठ दिवस पाऊस आला नसता तर पिके धोक्यात आली असती़ कपाशीच्या झाडांनी व सोयाबीनने मान टाकली होती; पण पावसाने पिकांना नवसंजीवनी दिली. सोयाबीन ऐन बहरात असताना पाऊस बरसल्याने हातचे गेलेले सोयाबीन पीक आता हमखास उत्पन्न देणार, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत़ एकूण चार-पाच दिवसांपासून दररोज नित्यनेमाने हजेरी लावणारा पाऊस पिकांसोबत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलून गेल्याचे दिसते़(वार्ताहर)
ंकपाशीच्या पिकाला ‘देशी’चा डोज
कपाशी पिकाला सध्या फवारणी केली जात असून काही ज्ञानी शेतकरी कीटकनाशक फवारण्याऐवजी देशी दारूची फवारणी करीत असल्याचे पाहावयास मिळते़ एका डब्याला एक २०० मिलीची बॉटल, हे प्रमाण वापरले जात असल्याचे सांगतात़ देशी दारुची कपाशी पिकावर फवारणी केल्यास जोमाने वाढ होते, झाडं टवटवीत दिसतात व रोग, कीडीचे कपाशीवर आक्रमण होत नाही, असा शेतकऱ्यांचा समज आहे.
फवारणी करणारा माणूस देशीचा डोज पोटात रिचवू नये म्हणून मालक आपल्या हाताने देशी दारूची शिशी फवारणी यंत्रात रिकामी करीत असल्याचे फवारणी करणारे सांगतात; पण मालकाशी सलगी केली की, दिवसातून तीन वेळा थोडी-थोडी मिळते, असेही ते खासगीत सांगतात.

Web Title: Varunaraja Barasala; The farmer has dried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.