वनरक्षकांची निवासस्थाने सुविधांपासून वंचित
By Admin | Updated: May 15, 2014 01:41 IST2014-05-15T01:41:49+5:302014-05-15T01:41:49+5:30
वनविभागाने लाखो रुपये खर्ची घालून उभारलेली निवासस्थाने वनरक्षकाविना अद्याप ओस पडली आहेत. याप्रकरणी वरिष्ठांनी अहवाल मागितला;

वनरक्षकांची निवासस्थाने सुविधांपासून वंचित
लाखो रुपयांचा खर्च : ओस पडल्या वस्तू, वनसुरक्षाही वार्यावर
समुद्रपूर : वनविभागाने लाखो रुपये खर्ची घालून उभारलेली निवासस्थाने वनरक्षकाविना अद्याप ओस पडली आहेत. याप्रकरणी वरिष्ठांनी अहवाल मागितला; मात्र कारवाईचा थांगपत्ता नाही. यामुळे ही निवासस्थाने अद्याप दुर्लक्षीत आहेत.
वनरक्षकांची निवासस्थानी सातत्याने गैरहजेरी राहत असल्यामुळे, अवैध वृक्षतोड, गुरेचराई, वन्यजीवांच्या शिकारीला प्रतिबंध घातला जाण्याऐवजी चालना मिळत असल्याचा प्रत्यय येत आहे. समुद्रपूर वनपरिक्षेत्रात अवैध शिकारीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. याची खातरजमा करणार्या प्रकरणांच्या नोंदी केवळ वनविभागाच्या दस्ताऐवजात ठेवण्यासाठीच आहे; मात्र वन्यजीव संर्वधनाकरिता कुठल्याही ठोस उपायोजना सध्या कार्यान्वित नाहीत. या भागातील वन आणि वन्यजीव वनरक्षकांच्या अनुपस्थितीने पोरकी झाली आहेत. तालुक्यातील गिरड मंगरुळ सहवन परिक्षेत्रातील वनरक्षकांनी निवासस्थाने बेवारस झाली आहेत. या प्रकाराने विनाकारण निवासस्थानाच्या दुरुस्तीचा आणि वीजदेयकाचा भुर्दंड वनविभागाच्या तिजोरीवर पडत आहे.
तालुक्यातील गिरड, मंगरुळ सहवन परिक्षेत्रातील शिवणफळ आणि वानरचुहा येथील वनरक्षक तैनात नसतो. त्यामुळे अवैध वृक्षतोड आणि वाहतुकीला मोकळे रान उपलब्ध झाले आहे. सर्व सोयीयुक्त तपासणी नाके सध्या वनरक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र वनरक्षकही वरिष्ठ अधिकार्यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत, असावे अशी स्थिती आहे. गिरड सहवन परिक्षेत्रातील गिरड, खुर्सापार, मोहगाव, तावी येथील वनरक्षकांचे निवासस्थाने मागील एक वर्षापासून बंद आहेत. निवासस्थानांकडे कोणी फिरकतही नाही. काही निवासस्थाने कुलूपबंद आहेत. त्यामुळे परिसरात झुडपांचा वेढा पडला आहे.
ताडगाव येथील वनरक्षकांच्या निवासस्थानांची अवस्थाही अशीच आहे. या समस्येकडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)