वाघाने पाडला गाईचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:41 IST2019-03-28T22:41:03+5:302019-03-28T22:41:23+5:30
गिरड सहवन परिक्षेत्रातील तावी जंगलाला लागून असलेल्या शेतातील गोठ्यात प्रवेश करून गाय ठार करण्यात आली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली असून सदर गाय वाघाने ठार केली असावी असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे.

वाघाने पाडला गाईचा फडशा
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : गिरड सहवन परिक्षेत्रातील तावी जंगलाला लागून असलेल्या शेतातील गोठ्यात प्रवेश करून गाय ठार करण्यात आली. ही घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली असून सदर गाय वाघाने ठार केली असावी असा अंदाज शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. या घटनेमुळे शेतकºयाचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्ताला तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आहे.
प्राप्त माहितीनुसार, तावी गावातील शेतकरी राम नरेश यादव यांच्या मालकीची गाय शेतातील गोठ्यात बांधण्यात आली होती. दरम्यान वाघाने गाईवर हल्ला करून तिला ठार केले. सकाळी ही घटना लक्षात येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे पी. डी. बाभळे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक विजय आडकीने, वनरक्षक एस. जे. उरकुडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी स्वप्नील सोनवणे यांनी गाईचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत आहे.
हिंगणीसह शिवणगावात बिबट्याची दहशत
बोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या शिवणगाव व हिंगणी शेतशिवारात सध्या बिबट्याचे वास्तव्य आहे. इतकेच नव्हे, तर या बिबट्याने काही पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना गतप्राण केल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. प्राप्त माहितीनुसार, शिवणगाव शेतशिवारात गोठ्याबाहेर बांधून असलेल्या कालवडीला बिबट्याने ठार केले. तर याच भागातील गोठ्यात शिरून बिबट्याने एक वासरू ठार केले आहे. तर हिंगणी गावात घराच्या अंगणात बाधून असलेली शेळी बिबट्याने ठार केली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये बिबट्याबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाºयांनी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.