कोरोना सत्रात ७,३२७ बालकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST2020-10-06T05:00:00+5:302020-10-06T05:00:34+5:30
महामारीतही बालकांचे लसीकरण रखडले नसून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सात हजार ३२७ बालकांना लस देण्यात आली आहे. मात्र, कोरोनायनात बालकांना घराबाहेर कसे न्यावे, असा प्रश्न पालकांना पडला असून पालकांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.

कोरोना सत्रात ७,३२७ बालकांचे लसीकरण
चैतन्य जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बालकांना आजारापासून दुर ठेवण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक लसी दिल्या जातात. भविष्यात गंभीर आजारांपासून या बालकांचे रक्षण होवून त्यांचे आयुष्य निरोगी राहावे, यासाठी आरोग्य विभाग सातत्याने लसीकरणाची मोहीम राबवित असतो. या मोहीमेचा लाभ जास्तीत जास्त बालकांना व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, कोरोना महामारीतही बालकांचे लसीकरण रखडले नसून एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात सात हजार ३२७ बालकांना लस देण्यात आली आहे. मात्र, कोरोनायनात बालकांना घराबाहेर कसे न्यावे, असा प्रश्न पालकांना पडला असून पालकांसमोर मोठा प्रश्न पडला आहे.
मार्च महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले. लसीकरणासाठी खात्रीशीर समजल्या जाणाऱ्या ग्रामीण आरोग्य केंद्रात लागणाºया रांगा कोरोना काळात गायब झाल्या. एकीकडे कोरोनावर एखादी लस आली तर किती बरे होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र, इतर आजारांपासून आपल्या बाळाला सुरक्षित ठेवणारी लस देण्यासाठी बाळाला बाहेर कसे न्यायचे, असा प्रश्न सध्या पालकांपुढे उभा ठाकला आहे.
या लॉकडाऊन व कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणारी लसीकरण मोहीम विस्कळीत झाली होती.
एप्रिल आणि जून महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात कोरोना बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत चालल्याने लसीकरण मोहीमेवर काही प्रमाणात परिणाम झाला. मात्र, आरोग्य विभागाने घरोघरी जात बालकांचे लसीकरण केले असून पालकांना दिलासा मिळाला.
वंचित बालकांचा शोध
कोरोना संसर्गामुळे प्रतिबंधित क्षेत्रात लसीकरणाचे सत्रे आयोजित करण्यावर मर्यादा येत होत्या. तसेच महामारीच्या काळात बालकांना घेऊन लसीकरण कसे करावे, अशी भीती पालकांच्या मनात आहे. यामुळे अनेक बालके लसीकरणापासून वंचित राहिली आहे. यामुळे बालकांना विविध आजारांना पुढे सामोरे जावे लागू शकते.