दोन वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्तच
By Admin | Updated: June 20, 2015 02:30 IST2015-06-20T02:30:13+5:302015-06-20T02:30:13+5:30
आर्वी तालुक्यात विरूळ(आ.) हे सर्वात मोठे गाव आहे. येथे प्रथम श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे.

दोन वर्षांपासून पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्तच
पशुपालकांचे नुकसान : प्रशासन उदासीन
विरुळ (आकाजी) : आर्वी तालुक्यात विरूळ(आ.) हे सर्वात मोठे गाव आहे. येथे प्रथम श्रेणीचा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्याला विरूळ सहीत २२ गावे गावे जोडल्या गेली आहे. परंतु दोन वर्षांपासून येथील पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्तच आहे. त्यामुळे जनावरांवर कसे उपचार करावे, असा प्रश्न शेतकरी वर्गाला सतावत आहे.
दोन वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्तच आहे. त्यामुळे सर्व दवाखान्याचा भार सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांवर होता. त्यात सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी यांचीही बदली साहूर येथे झाल्याने येथे आता केवळ दोनच कर्मचारी असून या दोन कर्मचाऱ्यांच्याच भरोश्यावर २२ गावांचा डोलारा चालतो. त्यात हे दोन्हीही कर्मचारी मुख्यालयी रहात नाही. पावसाळ्याच्या दिवसात जनावरे कधी आजारी पडेल याचा नेम नसतो. मागील महिन्यात अज्ञात रोगाने २० बकऱ्या दगावल्या तरीही या दवाखान्यात डॉक्टरांचा पत्ताच नाही. या दवाखान्याचा तात्पुरता कार्यभार रोहण्याच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे असून तो अधिकारी विरूळच्या दवाखान्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून उपचाराअभावी जनावरे दगावण्याचा धोका असतो. तालुक्यात सर्वात मोठा दवाखाना म्हणून ओळख आहे. परंतु या दवाखान्यात दोन वर्षापासून अधिकारी नसल्याने आश्चर्य व्यक्त आहे.(वार्ताहर)