औषधीयुक्त बेल वृक्ष ठरतोय शेतकऱ्यांकरिता उपयुक्त
By Admin | Updated: October 25, 2014 01:41 IST2014-10-25T01:41:33+5:302014-10-25T01:41:33+5:30
रोगाला नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बेलवृक्षाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

औषधीयुक्त बेल वृक्ष ठरतोय शेतकऱ्यांकरिता उपयुक्त
वर्धा : रोगाला नष्ट करण्याची क्षमता असलेल्या बेलवृक्षाचे आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेलाच्या झाडाचे फळ विविध औषधींसाठी उपयुक्त ठरते. बहुपयोगी असणारे बेलाचे झाड शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही सिद्ध होत आहे. या फळाच्या माध्यमातून शेतीला जोडधंदा मिळाला आहे. फळावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उत्पादन तयार केले जात आहे.
धार्मिकदृष्ट्या महादेवाला प्रिय बेलपत्र तसेच हिंदू धर्मात महत्त्व असलेल्या व भगवान शिवरूप समजल्या जाणाऱ्या बेल वृक्षाला उन्हाळ्यात बहार येत असल्याने हिवाळ्याच्या दिवसात त्याचे संवर्धन करण्यात येत आहे. या झाडाला उन्हाळ्याच्या दिवसात फळे लागत असतात. यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर या वृक्षाची लागवड केली आहे. झाडाच्या फळे व पानापासून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत सुरू झाले आहेत. काहींनी हा अभिनव उपक्रम आपल्या शेतात सुरू केला आहे. बेलवृक्षाचे शास्त्रीय नाव एगल मामालोस असून सदाफळ, शाण्डिलु (पीडानिवारक) म्हणून ते ओळखल्या जाते. या फळाचे सरबत, मुरंबा व औषधीयुक्त सामर्थ्य यात आहे.
वातशामक व पाचन क्रियेसाठी त्याचा उपयोग केला जातो. तर श्रावण महिन्यात घरोघरी महादेवाच्या पिंडीवर बेलपत्रे वाहण्याची प्रथा आहे. मंदिर परिसरात हा वृक्ष आढळून येतो. शेतीच्या बांधावर हे वृक्ष लावणेही शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरत आहे. विशेषत: काटेरी वृक्ष असल्याने माकड वगैरे या वृक्षापासून लांब राहतात. श्रावण महिन्यात बेलपानाची मागणी लक्षात घेता ते आर्थिक स्त्रोत होऊ शकते. तसेच त्याच्या फळातील गरापासून होणारा मुरब्बा व सरबत केल्यास शेतकऱ्यांसाठी जोडधंदादेखील होऊ शकते. अशा औषधीयुक्त गुणांमुळे यातून परमार्थही साधणे शक्य आहे. (शहर प्रतिनिधी)