पावसाच्या थेंब अन् थेंबाचा उपयोग
By Admin | Updated: May 25, 2016 02:17 IST2016-05-25T02:17:10+5:302016-05-25T02:17:10+5:30
पावसाच्या पाण्याचे होत नसलेले नियोजन व पूढील काळात निर्माण होणारी भीषणता ओळखून ‘लोकमत’ने पाण्याचे महत्त्व सर्वांना कळावे ..

पावसाच्या थेंब अन् थेंबाचा उपयोग
विद्यार्थी झाला जलमित्र : रेन वॉटर हॉर्वेस्टींगसाठी पुढाकार
वर्धा : पावसाच्या पाण्याचे होत नसलेले नियोजन व पूढील काळात निर्माण होणारी भीषणता ओळखून ‘लोकमत’ने पाण्याचे महत्त्व सर्वांना कळावे व नागरिकांतूनच पाणी वाचविण्याची मोहीम छेडली जावी म्हणून ८ मे पासून जलमित्र अभियान सुरू केले. यात अभिनव कल्पकतेतून पावसाच्या पाण्याचा संचय करणारे अनेक जण पूढे येत आहेत. हिंगणघाट येथील अनिकेत मनोहर पोकळे या युवकानेही पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब विहिरीत मुरवून पुनर्भरणाचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.
पॉलिटेक्निकचे शिक्षण घेताना अनिकेतला पर्यावरण (एनव्हायर्नमेंट) हा विषय होता. त्यामुळे पर्यावरण रक्षणार्थ मिळेल तो उपाय करायचा, ही खुणगाठच त्याने मनाशी बांधली होती. गतवर्षी त्याचे घर बांधायला सुरुवात झाली. उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई लपलेली नव्हती. यामुळे घर बांधत असतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पावसाचे पुनर्भरण करायचे हा विचार त्याने पक्का केला होता. त्यामुळे स्लॅबवरील पूर्ण पाणी एका पाईपद्वारे काढून तो पाईप विहिरीत सोडला. यामुळे आसपासच्या घरांच्या तुलनेत त्याच्या घरच्या विहिरीला अधिक पाणी आहे. उन्हाळ्यातही पाणी पातळी चांगली असल्याचे अनिकेत सांगतो.(शहर प्रतिनिधी)
‘लोकमत’ने ८ मे पासून ‘जलमित्र’ अभियान सुरू केले आहे. यात नागरिकांनी पाणी वाचविण्यासाठी केलेले विविध प्रयोग समोर येत आहेत. या अभियानात नागरिकांना आपल्या उपक्रमासोबत ‘जल-सेल्फी’ही ‘लोकमत’कडे देता येणार असून जलजागृती हाच याचा उद्देश आहे.
पूर्वनियोजन केल्यास जलसंचय अधिक
अनेक जण घर बांधेपर्यंत रेन वाटर हार्वेस्टिंगचा विचार करीत नाही. सर्व बांधून झाल्यावर एखाद्याने सुचविल्यास त्या दृष्टीने विचार होतो; पण घर बांधतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंग करून मोठ्या पाईपद्वारे घरावर जमा होणारे पावसाचे पाणी विहिरीत सोडल्यास पावसाचा एक थेंबही वाया जात नाही.