शहरी भागातही घरकूल योजनेची दैनाच
By Admin | Updated: December 22, 2014 22:51 IST2014-12-22T22:51:56+5:302014-12-22T22:51:56+5:30
शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने रमाई घरकुल योजना व एकात्मिक शहर विकास आराखड्यांतर्गत घरकुल देण्याची योजना अंमलात आणली.

शहरी भागातही घरकूल योजनेची दैनाच
वर्धा : शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्यांना घर देण्याकरिता शासनाच्यावतीने रमाई घरकुल योजना व एकात्मिक शहर विकास आराखड्यांतर्गत घरकुल देण्याची योजना अंमलात आणली. या अंतर्गत गरजवंतांना घर देण्याची प्रक्रीया सुरू असताना जिल्ह्यातील सहाही नगर पालिकेच्या क्षेत्रात लाभार्थी असताना मोठ्या प्रमाणात घरकुल शिल्लक असल्याची माहिती आहे. यात अनुदानात वाढ होणार असल्याने ते प्रशासनाच्यावतीने लाभार्थ्यांना देण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे
शहरी भागात राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेंतर्गत सातही पालिकेत एकूण ५४८ घरकुल मंजूर करण्यात आले आहे. यापैकी २९३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर २५५ घरांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. तर एकात्मिक शहर विकास आराखड्यांतर्गत २००४ घरकुल देण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यापैकी मंजूर झालेल्या ८९५ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले तर १७५ घरकुलांचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे.
जिल्ह्यात घरकुलांची संख्या उपलब्ध असताना त्यांचे वितरण होत नसल्याचे दिसते. केवळ अनुदान वाढीच्या प्रतीक्षेत ते अडकले असल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)