अप्पर वर्धा धरणाच्या भिंतीला तडे
By Admin | Updated: November 6, 2014 23:00 IST2014-11-06T23:00:41+5:302014-11-06T23:00:41+5:30
वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात गौणखनिज टेकड्यांना ब्लास्टिंग करून उद्ध्वस्त करण्याचा घाट चोरट्यांनी घातल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़

अप्पर वर्धा धरणाच्या भिंतीला तडे
अमोल सोटे - आष्टी (श़)
वर्धा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात गौणखनिज टेकड्यांना ब्लास्टिंग करून उद्ध्वस्त करण्याचा घाट चोरट्यांनी घातल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ यामुळे अप्पर वर्धा धरण असुरक्षित झाले असून भिंतीला काही ठिकाणी तडे गेल्याचे दिसले़ भविष्यात डागडुजी व दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाल्यास चांगलाच धोका होण्याची शक्यता आहे़ यास महसूल व वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करताहेत़
वर्धा जिल्ह्याचे शेवटचे टोक आष्टी तालुका आहे. आष्टीच्या अवघ्या १० किमी अंतरापासून अप्पर वर्धा धरणाचे शेवटचे टोक सुरू होते. शासनाच्या नियमानुसार किमान २५ किमी परिसरात ब्लास्टिंग व अवैध उत्खनन करण्यावर बंदी आहे. सदर बंदी झुगारून माफियांनी प्रशासनाला हाताशी धरून खुलेआम मुरूम, गिट्टी उत्खनन व वाहतूक सुरू केली आहे. जंगल परिसरातील वन्यप्राणी ब्लास्टिंगच्या हादऱ्याने धास्तावले आहेत़ मौजा येनाडा, पिलापूर गावाच्या १ किमी अंतरावर गिट्टी व मुरूमसाठी रस्त्यालगत एक टेकडी चांगलीच पोखरून काढली आहे़ पाणी साचल्याने वन्यप्राणी व बाजूला शेती असणारे शेतकरी, गुरांना ये-जा करताना धोका निर्माण झाला आहे. त्याच्या ३ किमी पूढे जोलवाडी गावाजवळ मुरूमाच्या टेकड्याही खोदण्यात आल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़
अप्पर वर्धा धरणाचे प्रतिबंधीत क्षेत्र असुरक्षित आहे. उत्खननासोबतच गावठी दारू तयार करण्यासाठी काठावर हातभट्ट्या लावण्यात आल्या आहेत़ धरण विभागाच्या बांधलेल्या इमारती क्षतिग्रस्त झाल्या असून कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे भेटीप्रसंगी सांगण्यात आले़ यामुळे सदर इमारती अनैतिक व्यवसायांचे केंद्र बनल्याचे तेथील साहित्यावरून दिसून आले़ याठिकाणी दारूच्या पार्ट्या दिवसाढवळ्या होतात़ धरणाजवळील सुरक्षेची भिंतीला डागडुजी न झाल्याने ब्लास्टिंगच्या हादऱ्याने पूर्णत: तडा गेल्या आहेत़ धरणात १०० टक्के जलसाठा आहे. अशावेळी तात्काळ दुरूस्ती करणे आवश्यक आहे. धरणाचा मार्ग दारूविक्रेत्यांनी ठिकठिकाणी फोडून टाकला आहे. अधिकारी अर्थपूर्ण व्यवहारात व्यस्त आहेत़ सध्या रबी हंगाम सुरू झाला आहे़ शेतकरी पाण्यासाठी संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून आले़