शहर ठाण्याच्या कोठडीत अस्वच्छता
By Admin | Updated: July 14, 2014 02:30 IST2014-07-14T02:30:17+5:302014-07-14T02:30:17+5:30
शहर पोलीस ठाण्यातील लॉक-अप रूममध्ये अस्वच्छता व अव्यवस्था आहे़

शहर ठाण्याच्या कोठडीत अस्वच्छता
यंत्रणेचे दुर्लक्ष : पोलीस अधीक्षकांना निवेदन
वर्धा : शहर पोलीस ठाण्यातील लॉक-अप रूममध्ये अस्वच्छता व अव्यवस्था आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकल्यानंतर किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांना २० तास कोठडीत ठेवण्यात आले़ यामुळे लॉक-अप रूममध्ये असलेली अस्वच्छता समोर आली़ याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी किसान अधिकार अभियानने केली आहे़ याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनही सादर केले आहे़
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नाफेड अंतर्गत तूर व चण्याचे थकीत चुकारे देण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचे ओदांलन किसान अधिकार अभियानने केले़ यानंतर कार्यकर्त्यांना २० तास वर्धा पोलीस ठाण्यातील लॉक-अप रूममध्ये ठेवण्यात आले़ यात शारीरिक, मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अयोग्य वातावरण असल्याचे दिसून आले़ मागील कित्येक महिन्यांपासून या खोल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. सर्व भिंतीवर गुटखा, खर्रा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांचे सुमारे २-३ मिमीचे थर आहे़ भिंतींच्या कोपऱ्यात थुंकीचा मोठा चर खालून तीन-चार फुट उंचीपर्यंत साचला आहे. या प्रकारामुळे आधीच कोंदड असलेल्या खोलीत दुर्गंध पसरलेला आहे़ संपूर्ण खोलीला एकच दरवाजा असल्याने हवा व प्रकाश खोलीत येतच नाही. खोलीत पंखा व दिव्याची कुठलही व्यवस्था नाही. संपूर्ण रात्रभर उकाडा, गर्मी व डासांचा त्रास सहन करावा लागतो़ जंतू, डासनाशक औषधांची फवारणी कित्येक वर्षांपासून करण्यात आलेली नाही़
खोलीतच एका कोपऱ्यात असलेला खुला संडास नादुरूस्त आहे. संडासच्या भिंतीची उंची तीन फुटही नाही. सोबतच अनेक महिन्यांपासून या संडासची सफाई कोणत्याही द्रव्याने करण्यात आली नाही. पाणी घेण्यासाठी कुठलेही भांडे नाही. तोंड धुण्यासाठी वापरलेले पाणी जाण्याची वेगळी व्यवस्था नाही. यामुळे तोंडातील पाण्याची चुळ संडासच्या सिटमध्ये सोडणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक असताना ते करावे लागते. सतत दुर्गंधीचा सामना करावा लागतो़ बसण्यासाठी खोलीत असलेल्या चादरीही अनेक वर्षांपासून बदलण्यात वा धुण्यात आल्या नाहीत़ अनेक आरोपींनी वापरलेल्या चटयाच झोपण्यासाठी देण्यात आल्यात़ यात मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली आहे़
पिण्याचे पाणी व खोलीतील घाण (कचरा) जमा करण्याची बादली लागूनच आहे. पाणी पिण्यास अयोग्य असून आरोपींना लॉक-अप रूममध्येच ते प्यावे लागते. सर्व आरोपी एकाच पेल्याने तोंड लावून व पाण्यात पेला बुडवून पाणी पितात़ यातून हाताचा मळ, तोंडातील जंतु, डस्टबीनमधील घाणेचा संसर्ग पाण्याला होतो. जेवणासाठी हातात पोळ्या व प्लास्टिकच्या द्रोणमध्ये पातळ भाजी दिली जाते़ ती भाजी अस्वच्छ जमिनीवर ठेवून मांडीवर पोळी घेत आरोपींना दोन वेळचे बाहेरून येणारे अन्न खावे लागते़ जेवणाची तपासणी कुणीही पोलीस शिपाई करीत नाही.
पोलीस ठाण्यातील कोठडीच्या या दुरवस्थेमुळे पोलीस ठाण्याचे वातावरणही दूषित झाले आहे़ कोणतीही व्यक्ती आरोपी असली तरी ती गुन्हेगार असेल, असे आवश्यक नाही. गुन्हा सिद्ध झाला तरी न्यायालय सांगेल तीच शिक्षा त्या इसमाला भोगावी लागते; पण जिल्ह्यातील तसेच वर्धा शहर पोलीस ठाण्यात ही अफलातून शिक्षा पोलीस खात्यामार्फत का दिली जाते, असा सवाल किसान अधिकार अभियानने उपस्थित केला आहे़
जिल्हा पोलीस यंत्रणेने याकडे लक्ष देत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये असलेल्या लॉक-अप रूमची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
मानवाधिकार आयोगाकडे करणार तक्रार
पोलीस ठाण्याच्या कोठडीत डांबलेला प्रत्येक व्यक्ती आरोपी नसतो़ गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तो आरोपी होतो़
पोलीस ठाण्यांत पोलीस चांगली वागणूक देत असले तरी तेथील कोठडी असह्य होते़ यामुळे लॉक-अप रूम स्वच्छ कराव्या, अन्यथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करू, असा इशारा किसान अधिकार अभियानने दिला़
कार्यकर्त्याचे आरोग्य बिघडले
किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्यासह ११ कार्यकर्त्यांना आंदोलन केल्यामुळे शहर पोलिसांनी अटक केली़
सर्वांना शहर पोलीस ठाण्याच्या लॉक-अप रूममध्ये तब्बल २० तास ठेवण्यात आले़
कोठडीतील दुर्गंधी, अस्वच्छता, झोपण्यासाठी दिलेल्या धूळ व दुर्गंधीयुक्त चटया यामुळे कुणीही रात्रभर झोपले नाही़
परिणामी, एका कार्यकर्त्याची प्रकृती बिघडली़ सदर कार्यकर्त्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचार करण्यात आल्याने असंतोष पसरला होता़
किसान अधिकार अभियानने या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे़ किसान अधिकार अभियानच्या निवेदनावर त्वरित कारवाई करण्यात येईल़ यासाठी प्रक्रियाही सुरू केली जाईल़
- अनिल पारस्कर,
जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा़