लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा (घा.) : अचानक वातावरणात बदल झाल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असतानाच कारंजा तालुक्यात पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जवळपास दीड ते दोन तास बरसलेल्या या पावसात बाजार समितीमधील व्यापाºयांचे साडेतीन हाजर क्विंटलपेक्षा अधिक धान्य ओले झाले. तसेच शेतशिवारातील पिकांचीही मोठ्या प्रमाणात नासडी नासाडी झाली असून शेतकºयांच्या अडचणीत भर पडली आहे.गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाजही व्यक्त केला आहे. खरिपाचे पिक हातचे गेल्यानंतर शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर आशा असतानाच आता अवकाळीच संकट घोंगावत आहे. शेतशिवारात गहू व चण्याच्या मळणीला वेग आला असून बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास कारंजा तालुक्यात अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. तब्बल दोनतास धो-धो बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचीही दाणादाण झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील व्यापाऱ्यांचा जवळपास साडेतीन हजार क्विंटल शेतमाल ओला झाला. यामध्ये गहू, चणा, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचा समावेश आहे.
संत्रा बागांनाही बसला वादळाचा फटकाकारंजा तालुक्यात संत्र्याच्या बागाही मोठ्या प्रमाणात असून गुरुवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने संत्रा बागांनाही मोठा फटका बसला आहे. यासोबतच शेतात मळणीला आलेला किंवा मळणीकरिता कापून ठेवलेला गहू, चणा मातीमोल झाला. शेतात उभा असलेला गहूही जमिनीवर आडवा झाला आहे. त्यामुळे उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहील, अशी पूर्वसूचना दोन दिवसांपूर्वी दिली होती. तरीही काही शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीकरिता आणला होता. गुरुवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसात ओला झालेला शेतमाल हा व्यापाºयांचा असून तो कालच खरेदी केलेला नसून चार ते पाच दिवसापूर्वीचा आहे.प्रशांत सोमकुवर, प्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा