अधिकाऱ्यांच्या हातीच विद्यापीठाची प्रतिष्ठा
By Admin | Updated: August 9, 2015 02:10 IST2015-08-09T02:10:02+5:302015-08-09T02:10:02+5:30
विशेषत्वाने कर्ता, शस्त्र व अस्त्र, कौशल्य, प्रतिष्ठान व दैव या पंचसुत्राचा अवलंब प्रत्येक विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला तर विद्यापिठाचा नावलौकिक व प्रतिष्ठा वाढू शकते, ...

अधिकाऱ्यांच्या हातीच विद्यापीठाची प्रतिष्ठा
सिद्धार्थ काणे : रातुम नागपूर विद्यापीठाच्या नवनियुक्त मान्यवरांचा सत्कार
वर्धा : विशेषत्वाने कर्ता, शस्त्र व अस्त्र, कौशल्य, प्रतिष्ठान व दैव या पंचसुत्राचा अवलंब प्रत्येक विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला तर विद्यापिठाचा नावलौकिक व प्रतिष्ठा वाढू शकते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे यांनी केले.
स्थानिक बोरगाव (मेघे) येथील औषधीनिर्माण शास्त्र शिक्षण व संशोधन संस्थेच्या सभागृहात रा.तु.म नागपूर विद्यापीठातील नवनियुक्त मान्यवरांचा सत्कार समारंभ वर्धा शहरातील शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने शुक्रवारी पार पडला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरु डॉ. काणे यांच्यासह कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, डॉ. डी.के. अग्रवाल यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर अतिथी ंम्हणून माजी आमदार सुरेश देशमुख, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावतीचे सचिव युवराजसिंग चौधरी, कोषाध्यक्ष पंकज देशमुख, डॉ. प्रदीप धांडे, डॉ. अशोक पावडे, प्रा. राजेंद्र गंजिवाले उपस्थित होते.
कुलसचिव मेश्राम म्हणाले, हा सत्कार आमच्या भावी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. तसेच विद्यापीठाच्या सर्वच नियोजनामध्ये भारतीय घटनेतील स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या त्रिसुत्रीचा पाया असला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून विद्यापीठाने प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठातील परीक्षा व निकालांचा संदर्भाने तत्परता कशी आणता येईल, यासाठी प्रयत्नरत राहण्याची ग्वाही दिली. डॉ. डी.के. अग्रवाल, संचालक बीसीयुडी यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
प्रमुख अतिथी डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलपती, कृष्णा इन्स्टिटयुट आॅफ मेडिकल सायंसेस कराड यांनी विद्यापीठात नव्याने आलेल्या चारही मान्यवरांची विद्यापीठाला उच्च स्थरावर नेण्याची मनात तीव्र इच्छा असणे फार आवश्यक आहे व तीच प्राथमिक बाब आहे, असे ते म्हणाले. तसेच आपल्या ध्येयाविषयी स्पष्टता असली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. विद्यापीठ ही आपली आई आहे मुलाला दृष्ट नजर लागू नये यासाठी जशी आई बाळाला काळा टिका लावते त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या विकासामध्ये अडसर येवू नये, यासाठी दृष्ट गोष्ठीना दूर ठेवले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी मान्यवरांकडून व्यक्त केली. विद्यापीठाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ‘मी’ कडूनचा प्रवास ‘आम्ही’ कडे झालेला आहे तो स्वार्थ विरहीत आहे हाच भाव भारताच्या घटनेच्या सुरुवातीला ‘वुई’ या शब्द वापरुन व्यक्त झालेला आहे. याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी अध्यक्षीय भाषणातून सत्कारमूर्तींकडून विद्यापीठाचे नावलौकिक करण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक आयोजक संस्थेच्या वतीने डॉ. अशोक पावडे, विभागप्रमुख , विधी शाखा यशवंत महाविद्यालय यांनी केले. विद्यापीठामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन नियोजन झाले पाहिजे, व त्यांच्या विषयी नियोजन कर्त्यांच्या मनात कणव असली पाहिजे ही बाब प्रामुख्याने त्यांनी आपल्या प्रास्ताविकात विषद केली.
याप्रसंगी सभागृहात प्रा. रोंघे, माजी प्राचार्य वसंत घोरपडे, डॉ. सुपे, प्रा. मोहता, आयोजक संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मनिषा पुराणिक यांनी केले तर आभार आयपरचे प्रा. राजेंद्र गंजिवाले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली.(जिल्हा प्रतिनिधी)