दादासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती वर्धेकरांसाठी अविस्मरणीय
By Admin | Updated: July 26, 2015 00:28 IST2015-07-26T00:28:41+5:302015-07-26T00:28:41+5:30
आधुनिक पाटलिपुत्र नरेश, भारतीय राज्यघटनेचे रक्षक, पवित्र दीक्षाभूमी वास्तूचे शिल्पकार, मानवता तथा न्यायाचे अग्रदूत, शेतकरी, शेतमजुरांचे पूर्णतया हितैषी, आधुनिक विचारधारा जोपासणारे...

दादासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती वर्धेकरांसाठी अविस्मरणीय
आधुनिक पाटलिपुत्र नरेश, भारतीय राज्यघटनेचे रक्षक, पवित्र दीक्षाभूमी वास्तूचे शिल्पकार, मानवता तथा न्यायाचे अग्रदूत, शेतकरी, शेतमजुरांचे पूर्णतया हितैषी, आधुनिक विचारधारा जोपासणारे विकासमूर्ती नेतृत्व अशी ओळख असलेले रिपाइंचे ज्येष्ठ नेते रा.सू. गवई उपाख्य दादासाहेब यांचा वर्धेशी घनिष्ठ संबंध होता. ते अमरावतीहून नागपूरकडे जाताना वर्धा जिल्ह्यातून जात; पण ते थेट नागपूरकडे न जाता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस करीत. वर्धेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्याच हस्ते झाले. यावरुन वर्धेशी त्यांचे नाते ध्यानात येते. ते अनेकदा वर्धेत आले. प्रत्येकवेळी ते लहानातील लहान कार्यकर्त्यांच्या हालअपेष्टा जाणून घेत. इतकेच नव्हे, तर अडीअडचणीही ते सोडवत. प्रत्येक कार्यकर्त्यांना ते नावासह ओळखत, हा त्यांचा मोठेपणा येथील रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना कायम स्मरणात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची न भरुन निघणारी हानी झाल्याचा सूर निधनाची वार्ता येताच त्यांच्या चाहत्यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना काढला. त्यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. याच प्रेमापोटी त्यांना सुदृढ आयुष्य लाभो..त्यांच्या हातून सदैव जनतेसाठी न्यायदानाचे कार्य सुरू राहावे म्हणून वर्धेत रिपाइंच्यावतीने तांदूळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बिहारचे राज्यपाल होते. त्यांनी आपल्या पदाचा विचार न करता कार्यक्रमाला सहकुटुंब हजेरी लावली. अत्यंत साधेपणा, सुशील व्यक्तिमत्त्वाचा परिचय या निमित्ताने कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष अनुभवता आला. अतिशय व्यस्ततेतूनही त्यांनी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास पांडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत त्यांच्या श्रीमती कमलताई, चिरंजीव रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई आवर्जून आले. त्यांनी पांडे कुटुंबातील प्रत्येकांची आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी फादर फुंचाईल यांनी दादासाहेबांना दीर्घायुषी व्हावे, असा आशीर्वाद दिला. हा प्रसंग पांडे कुटुंबासाठी अवस्मरणीय ठरला. कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे, माजी खासदार दत्ता मेघे, आ. रणजीत कांबळे, माजी आमदार सुरेश देशमुख यांच्यापासून तर इंदूमती वानखेडे, मधुकर कासारे, आर.एम. पाटील, डी.के. पाटील, अॅड. नरेंद्र पाटील, प्रमोद राऊत, प्रवीण हिवरे या मंडळींशी त्यांचा घरोबा होता. असे अनेक क्षण वर्धेतील आंबेडकरी जनतेच्याच नव्हे तर तमाम वर्धेकरांच्या मनात साठवून असून स्मृतीरुपाने कायम स्मरणात राहील. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी दादासाहेबांच्या निधनाची वार्ता धडकताच वर्धेतील चाहत्यांवर शोककळा पसरली.