नोकरीच्या नावावर बेरोजगाराची फसवणूक
By Admin | Updated: May 17, 2015 02:36 IST2015-05-17T02:36:00+5:302015-05-17T02:36:00+5:30
राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये नोकरी देण्याच्या नावावर वर्धेतील एका युवकाला फसविल्याचा प्रकार समोर आला आहे़ .

नोकरीच्या नावावर बेरोजगाराची फसवणूक
वर्धा : राजीव गांधी जीवनदायी योजनेमध्ये नोकरी देण्याच्या नावावर वर्धेतील एका युवकाला फसविल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणात सदर युवकाला एकूण २८ हजार ५५० रुपयांनी गंडा घालण्यात आला आहे. नितीन कांबळे, असे त्या युवकाचे नाव असून त्याने या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.
युवकाने दिलेल्या निवेदनानुसार, ८ एप्रिल २०१५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या माध्यमातून संजय शर्मा मॅनेजिंग डायरेक्टर, ट्रेनिंग मॅनेजर नामक व्यक्तीशी संपर्क साधला़ १० एप्रिल २०१५ रोजी सदर योजनेच्या कार्यालयातून निघालेले पत्र १६ एप्रिल २०१५ रोजी नितीन याला मिळाले़ राजीव गांधी जीवनदायी योजना केंद्र सरकारची योजना असल्याचे सांगण्यात आले होते; पण महाराष्ट्र सरकारचे गोविंद शिंदे यांची त्या पत्रावर स्वाक्षरी आढळून आली़ नियुक्ती पत्र हाती आल्यावर प्रथम सेक्युरिटी बाँड म्हणून त्या युवकाला ११ हजार ३०० रुपये बँक खात्यात भरावयास सांगण्यात आले़ सदर युवकाने ती रक्कम जमा केली़ यानंतर कोर्ट अॅग्रीमेंटच्या नावाखाली १७ हजार २०० जमा करण्यास सांगण्यात आले़ हा संपूर्ण व्यवहार दिल्ली कार्यालयाच्या संजय शर्मा पत्ता २५१/बी, राजीव गांधी रोड, सी.जी.ओ. कॉम्प्लेक्सच्यासमोर यावर झाला. यानंतर आपणास नोकरी मिळणार, अशी नितीनला खात्री पटली; पण तसे झाले नाही़
दुसऱ्या दिवशी संजय शर्मा यांनी पुन्हा भ्रमणध्वणीवर संपर्क साधला़ यावेळी ४ लाख ४० हजार रुपयांचा विमा धनादेश निघाला आहे. त्यासाठी २२ हजार रुपये भरावे लागणार असल्याची बजावणी केली़ सायंकाळपर्यंत कंपनीचे अधिकारी तुमच्या घरी येतील व तुमची प्रशिक्षणाची तारीख व सेवेचे कार्यालय निश्चित करतील, असेही सांगण्यात आले. पुन्हा रक्कम भरण्यास सांगितल्याने संशय आला़ यामुळे त्यांना अधिक विचारणा केली असता त्यांनी फोन बंद केला. इतकेच नव्हे तर त्या दिवसानंतर दिलेल्या क्रमांकावर कधीही ‘कॉल कनेक्ट’ झाला नाही़ फोनवर सांगितल्यानुसार घरीही कुणी आले नाही़ यामुळे फसगत झाल्याचे लक्षात येताच त्याने सदर प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. अधीक्षकांच्या सांगण्यावरून शहर पोलिसांना निवेदन सादर करण्यात आले़
राजीव गांधी जीवनदायी ही रुग्णांना सेवा व औषधोपचाराचा खर्च पुरविणारी योजना आहे़ यात शासनाकडून संबधित रुग्णालयांनाच खर्च दिला जातो़ असे असताना परराज्यातील काही भामटे त्यांचा नागरिकांची फसवणूक करण्याकरिता वापर करीत असल्याचे या प्रकरणावरून उघड झाले आहे़ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सदर युवकाने केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
भ्रमणध्वनीवर लुबाडणारे सक्रिय
नोकरीचे आमिष देऊन फसवणूक करणारे सक्रिय झाले आहेत़ यातही काही भामटे भ्रामक जाहिरातींच्या माध्यमातून युवकांना आकर्षित करीत असून भ्रमणध्वनीचा वापर करून त्यांची लुबाडणूक करीत आहेत़ राजीव गांधी जीवनदायी योजनेत नोकरीचे आमिष देऊन लुटण्याच्या या प्रकारातही एखादी टोळी सक्रीय असल्याची शक्यता वर्तविली जात आहे़
यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत़ काही नामांकित कंपन्यांच्या नावावर लहान कार्यालय थाटून बेरोजगारांची लूट करीत असल्याचे प्रकार उघड झाले आहे़ शिवाय आपला मोबाईल शॉर्टलिस्ट झाल्याचे सांगून कोट्यवधीचे बक्षिस लागल्याचे सांगून लूट केली जात आहे़ बेरोजगार युवकांनी यापासून सावध राहणे गरजेचे झाले आहे़