जुन्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्या
By Admin | Updated: June 1, 2016 02:43 IST2016-06-01T02:43:44+5:302016-06-01T02:43:44+5:30
जिल्हा कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध रोपवाटिकांमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना डावलून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात आले.

जुन्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्या
सिटूची मागणी : अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : जिल्हा कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध रोपवाटिकांमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना डावलून नवीन कामगारांना कामावर ठेवण्यात आले. या निषेधार्थ सेंटर आॅफ युनियन ईंडियन टे्रड युनियतर्फे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जुन्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्या, अशी मागणी कृषी अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली.
जिल्हा कृषी विभागांतर्गत सुरू असलेल्या रोपवाटिका, टीसीजी फार्म, बीजगुणन केंद्र नाचणगाव, जांब, सेलू आदी ठिकाणी गत २० ते २५ वर्षांपासून काही रोजंदारी कामगार कार्यरत होते. नवीन ठेकेदाराने जुन्या कामगारांना कामावरून काढून नवीन कामगारांना कामावर ठेवले. यानिषेधार्थ, तसेच ८ आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयानुसार कामगारांना मजुरी देण्यास दिरंगाई होत असल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करून कृषी अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
यावेळी कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर भारती यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. ३० ते ३५ वर्षांपासून कार्यरत कामगारांना कामावरून बंद न करता कृषी नर्सरीचे कंत्राट कुणीही घेतले तरी, ठेकेदाराने सर्वप्रथम जुन्या कामगारांना प्राधान्य द्यावे, अशी अट घालून दिली. मजुरी त्वरित देण्यात येईल. याशिवाय कामगारांना किमान वेतनापेक्षा कमी मजुरी दिली जाणार नाही, असे आश्वासन कृषी अधीक्षक भारती यांनी शिष्टमंडळाला दिले.
मागण्या मान्य न झाल्यास कृषी कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी सिटू कामगार संघटनेचे सचिव भय्या देशकर, सीताराम लोहकरे, महेश दुबे, जानराव नागमाते आदींची उपस्थिती होती. आंदोलनात संजय भगत, माला खडसे, उषा कावळे, राऊत, आंबेकर, पाटील, बारसागडे, साखरे, भैसारे, सहारे, पाटील यांचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)