गांधीजींच्या सर्वोदय विचाराला समजून घ्या!

By Admin | Updated: February 21, 2016 01:30 IST2016-02-21T01:30:34+5:302016-02-21T01:30:34+5:30

समानता आणि शोषणमुक्त समाज व्यवस्था गांधीजींच्या सर्वोदय विचारात आहे. प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्धतेसाठी कार्य आणि जगण्यासाठी शेती उत्पादने महत्वाची आहे.

Understand Gandhiji's supremacy! | गांधीजींच्या सर्वोदय विचाराला समजून घ्या!

गांधीजींच्या सर्वोदय विचाराला समजून घ्या!

राधा भट: अखिल भारतीय सर्वोदय महिला शिबिराला प्रारंभ
सेवाग्राम : समानता आणि शोषणमुक्त समाज व्यवस्था गांधीजींच्या सर्वोदय विचारात आहे. प्रत्येक व्यक्तीला रोजगार उपलब्धतेसाठी कार्य आणि जगण्यासाठी शेती उत्पादने महत्वाची आहे. श्रमिकांचे जीवन आदर्शव्रत असून श्रम करणारा आणि शिक्षित यांचे वेतन व मूल्य सारखे असावे असे बापू म्हणत. यातूनच समानता निर्माण होऊन अंहिसा आणि मूल्य रूजेल असे मत सर्व सेवा संघाच्या माजी अध्यक्ष राधा भट यांनी व्यक्त केले.
येथील यात्री निवासमध्ये शनिवारपासून अखिल भारतीय सर्वोदय महिला शिबिराला प्रारंभ झाला. यावेळी अध्यक्ष्यस्थानावरून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर पवनार आश्रमच्या कालिंदी राजस्थानच्या आशा ब्रोथ्रा, आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव विद्रोही, उषा पंडित उपस्थित होते. मान्यवरांनी बापू, विनोबा आणि जयप्रकाशा नारायण यांच्या प्रतिमेला सूतमाळ अर्पण केली. अन्य राष्ट्रांना आपण फार पुढे असल्याचे मानतो, पण वास्तवात पुढारलेल्या राष्ट्रात शोषण दिसून येते. हे थांबविण्यासाठी गांधीजींच्या सर्वोदय विचाराला समजून घ्यावे लागेल. असेही राधा भट यावेळी म्हणाल्या.
जयवंत मठकर म्हणाले, महिलांनी सामाजिक कार्यात आपला सहभाग वाढविला पाहिजे. यातून सबलीकरण तर होणारच पण सशक्त समाज व्यवस्थाही निर्माण होईल. महादेव विद्रोही म्हणाले, गोवंश हत्या बंदीचा कायदा राष्ट्रीय स्तरावर होणे गरजेचे आहे. जाट आंदोलनातील संघर्षावरही त्यांनी विचार व्यक्त केले.
कालिंदी बहन म्हणाल्या, करूणा, अंहिसा या मनोवृत्ती महिलांच्या अंत:करणातच असतात. कुटुंबालाच नव्हे तर राष्ट्राला सुस्थितीत नेण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे. त्यामुळे स्त्रियांनी या गुणांचा राष्ट्र व विश्वहितासाठी उपयोग करावा असे त्या म्हणाल्या. शिबिराचे संचालन व आभार शोभा डोणगावकर यांनी केले. महाराष्ट्र, गुजरात, आसाम, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यातील ६० महिला या शिबिरात सहभागी झाल्या आहेत.(वार्ताहर)

Web Title: Understand Gandhiji's supremacy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.