टाकरखेडा संस्थानचा अंतर्गत वाद पोलिसात
By Admin | Updated: August 28, 2015 02:01 IST2015-08-28T02:01:36+5:302015-08-28T02:01:36+5:30
विदर्भात नावलौकीक असलेल्या टाकरखेड येथील संत लहानुजी महाराज देवस्थानाचा वाद चिघळत आहे.

टाकरखेडा संस्थानचा अंतर्गत वाद पोलिसात
भक्तांमध्ये नाराजी : धर्मदाय आयुक्तांकडेही तक्रार
आर्वी : विदर्भात नावलौकीक असलेल्या टाकरखेड येथील संत लहानुजी महाराज देवस्थानाचा वाद चिघळत आहे. हा वाद पोलिसात पोहोचला आहे. शिवाय गावकऱ्यांनी धर्मदाय आयुक्तांकडेही तक्रार सादर केली आहे.
तीर्थक्षेत्र टाकरखेड येथील श्री संत लहानुजी महाराज संस्थानातील काही संचालक आणि नागरिकांनी मंदिरातील दानपेटी कटरने कापून फोडली. त्यावेळी मंदिरातील छुपे कॅमेरे बंद करण्यात आले होते. या दानपेटीतील लाखो रुपये एका खोलित नेवून मोजण्यासाठी दोन-तीन नागरिकांचे स्वाधीन केल्याची माहिती उपकार्यकारी संचालक डॉ. वसंत देशमुख यांना मिळताच त्यांनी आर्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीवरून पोलीस मंदिरात चौकशीसाठी येताच दानपेटीतील लाखो रुपयांची रक्कम पोत्यात भरून मागील बाजूस असलेल्या महादारातून कारने आर्वीला पळविण्यात आली आणि चिल्लर तेथेच ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या वादात संचालक मंडळाच्या कार्यालयात गोंधळ घालत उपकार्यकारी संचालक डॉ. देशमुख, जगताप यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी त्यावेळी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संचालक मंडळाने ९ आॅगस्ट २०१५ ला सभा घेऊन दानपेटी उघडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दानपेटीची किल्ली हरविल्याची तक्रार माजी कार्यकारी संचालकाने दिली. पोलिसांनी चौकशी केली असता गत १५ वर्षांपासून किल्ल्या उपकार्यकारी संचालक डॉ. वसंत देशमुख यांच्याकडेच असतात, हे सिद्ध झाले. धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय दानपेटी उघडू नये, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. दानपेटी उघडण्यासंदर्भात धर्मदाय आयुक्तांची परवानगी नसताना हे बेकायदेशीर कृत्य कशासाठी? याची योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात डॉ. देशमुख यांना विचारणा केली असता बेकायदेशीर कृत्य झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे त्यांनी सांगितले. दानपेटी पोलिसांनी जप्त करावयास पाहिजे होती; परंतु येथे राजकीय दबावाचा वापर करण्यात येत आहे. भक्त व नागरिकांच्या हितासाठी, संस्थानचे विकासासाठी आम्ही योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.(तालुका प्रतिनिधी)
मंदिराच्या कारभारात बाहेरच्या व्यक्तींची ढवळाढवळ
या मंदिरातील कारभारात बाहेरील व्यक्तींना ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. कार्यकारी संचालक आर्वी समिती आहे; परंतु विनाकारण दबाव निर्माण करण्यासाठी काही संचालकांनी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न चालविल्याने भक्तांत मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे.
दानपेटी कटरने कापून मंदिराला कलंक लावून गैरप्रकार दडपण्यासाठी तीच दानपेटी गॅसवेल्डिंगने जोडून ठेवण्यात आली. संस्थानाच्या दानपेटीत रक्कम किती होती ? हा प्रकार म्हणजे संथगतीने दरोडा टाकण्याचा नाही का ? दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न नाही का ? अराजकता कशासाठी ? मंदिरात शांतता पाहिजे की नसले उठाठेव ? असे अनेक प्रश्न भाविकांनी उपस्थित केले आहेत.