सुविधा अप्राप्त; पण टोल वसुली सुरू
By Admin | Updated: January 15, 2015 22:57 IST2015-01-15T22:57:16+5:302015-01-15T22:57:16+5:30
शहरातून हैदराबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ३० डिसेंबरपासून दारोडानजीक रस्ता देखभालीसाठी म्हणून अधिकृत टोल वसुली सुरू करण्यात आली; पण या महामार्गावर मोठे पूल, प्रवाशांना मुलभूत

सुविधा अप्राप्त; पण टोल वसुली सुरू
भास्कर कलोडे - हिंगणघाट
शहरातून हैदराबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ३० डिसेंबरपासून दारोडानजीक रस्ता देखभालीसाठी म्हणून अधिकृत टोल वसुली सुरू करण्यात आली; पण या महामार्गावर मोठे पूल, प्रवाशांना मुलभूत सुविधा अद्याप पुरविण्यात आल्या नाहीत़ यामुळे टोल मुक्तीचा नारा देणाऱ्या सरकारला टोल वसुलीची घाई का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़
राष्ट्रीय महामार्ग ७ वर बोरखेडी जवळ बायपास रस्ता वापरासाठीचा टोल वसूल होत असताना ३० डिसेंबर २०१४ पासून हिंगणघाट येथूनप १७ किमी अंतरावर दारोडा येथे टोल वसुली सुरू झाली़ ही टोल वसुली रस्ता वापरासाठी केली जात असल्याचे मत अधिकारी व्यक्त करतात़ नागपूर बोरखेडी टोलनाक्यापासून वडनेरपर्यंत ६०.८४५ किमी रस्त्यापैकी ५३.७९५ किमी पुर्णत्वास आलेल्या रस्त्याची २९० कोटी रुपयांची परतफेड व्हावी म्हणून या टोल नाक्याची स्थापना करण्यात आली; पण याच मार्गावर बोरखेडीजवळील ब्राह्मणी रेल्वे गेटवरील एकाच पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू आहे. हिंगणघाटच्या रेल्वे गेट क्ऱ १४ वरील उड्डाण पुलाचे बांधकाम पाच वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. यामुळे रेल्वे गेटवर वाहनांची दिवसातून अनेकदा दोन-तीन किमी रांग लागते़ खड्डे पडल्याने जड वाहनांचे नुकसान होते़ दारोडा गावाजवळील मोठ्या नाल्यावरील एकाच पुलावरून दुतर्फा वाहतूक होत आहे. यामुळे हे ठिकाण अपघात प्रवण स्थळ बनले़
या महामार्गावर बोरखेडीपासून पांढरकवडापर्यंत प्रसाधन गृहाची कुठेही सोय नाही. रस्ता दुभाजकावर काटेरी जंगली वनस्पती वाढली आहे़ आवागमन करणाऱ्या वाहनांना याचा त्रास होतो़ काही अंतरावर फलक असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. उड्डाण पूल, चौक, पोचमार्ग यावरील विद्युतीकरण व सौंदर्यीकरण झाले नाही. बांधकाम व सुविधांची पुर्तता व्हायची असताना टोल वसुली संशयास्पद ठरणारी आहे़