कृषी पंपाला अनधिकृत वीजपुरवठा
By Admin | Updated: November 15, 2014 01:54 IST2014-11-15T01:54:57+5:302014-11-15T01:54:57+5:30
शेतकऱ्यांकडून डिमांडची रक्कम घेत त्याचा डिमांड न भरता कृषी पंपांना वीज पुरवठा दिल्याचा प्रकार कारंजा (घाडगे) येथे माहिती अधिकारातून उजेडात आला आहे.

कृषी पंपाला अनधिकृत वीजपुरवठा
रुपेश मस्के कारंजा (घाडगे)
शेतकऱ्यांकडून डिमांडची रक्कम घेत त्याचा डिमांड न भरता कृषी पंपांना वीज पुरवठा दिल्याचा प्रकार कारंजा (घाडगे) येथे माहिती अधिकारातून उजेडात आला आहे. यात कारवाईचा बडगा येण्याच्या भीतीपोटी सहायक अभियंत्याने सोनगाव (रिठ) येथील दोन शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता दिलेला वीज पुरवठा खासगी कंत्राटदाराच्या कामगारांच्या सहकार्याने कापल्याने खळबळ माजली आहे. या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या दोन शेतकऱ्यांना दाभा वीज वितरण केंद्र क्रमांक २ चे सहाय्यक अभियंता शेटे यांनी सहा महिन्यांपूर्वी वीज पुरवठा दिला होता. हा पुवठा अचानक कापल्याने शेतकरी उषा प्रमोद चव्हाण, रा. कारंजा व सुभाष नत्थुजी चौधरी, रा. उमरी यांच्या शेतातील पीक धोक्यात आले आहे.
याबाबत सदर शेतकऱ्यांनी विचारणा केली असता कंत्राटदाराला हाताशी धरुन सहाय्यक अभियंत्याने त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या दोन्ही शेतकऱ्यांना दीड वर्षांपूर्वी सहाय्यक अभियंता शेटे यांनी कृषिपंपाचा वीजपुरवठा दिल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. शिवाय त्यांचा वीजपुरवठा हा सहा महिन्यांपासून सुरळीत सुरू होता.
गत काही दिवसांपासून कृषी पंपाच्या दाबाच्या तक्रारी वाढल्या. यामुळे येथील शेतकरी साहेबराव बैंगणे यांनी वीज वितरण कार्यालयात अनेकवेळा तक्रारी केल्या; परंतु उपयोग न झाल्याने या संदर्भात माहिती अधिकारात अर्ज टाकून या रोहित्रावरील अधिकृत ग्राहकांची यादी मागविली. यात रोहित्रावर कृषी पंपाच्या जोडण्या खूपच कमी असल्याचे समोर आले. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांकडून सहायक अभियंत्याने डिमांडची रक्कम घेतली; परंतु शेतकऱ्यांना डिमांडच दिले नसल्याचेही अधिकारात समोर आले.
पितळ उघडे पडण्याच्या धाकाने सदर सहायक अभियत्याने ११ नोव्हेंबर रोजी अचानक दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठा खंडित करून संपूर्ण पुरवठाच काढुन टाकण्याचा बेत आखल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलिताचा प्रश्न पडला आहे.