अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभारले अनधिकृत गाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:00:41+5:30
वर्ध्यातील मे. पुष्पदत्त बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, कच्छी लाईनचे संचालक विलास मानलवार यांनी कारला चौकातील जागेवर हेरिटेज प्लाझा नावाने सहा सदनिकेचे (फ्लॅट) अपार्टमेंट बांधले आहे. या अपार्टमेंटचे विकसक आणि मालक एकच असून त्यांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या दुकानाचे गाळे बांधले आहे.

अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभारले अनधिकृत गाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅटधारकांना पुरेशी पार्कीगची व्यवस्था करून देणे बंधनकारक असतानाही कारला चौकातील हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटच्या मालकाने या नियमाला बगल दिली आहे. फ्लॅटधारकांच्या मालकीची अर्धी पार्कीगची जागा गिळंकृत करुन अनधिकृतरीत्या दुकानाचे गाळे बांधले आहे. त्यामुळे फ्लॅटधारकांची मोठी अडचण झाली असून त्यांनी या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
वर्ध्यातील मे. पुष्पदत्त बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स, कच्छी लाईनचे संचालक विलास मानलवार यांनी कारला चौकातील जागेवर हेरिटेज प्लाझा नावाने सहा सदनिकेचे (फ्लॅट) अपार्टमेंट बांधले आहे. या अपार्टमेंटचे विकसक आणि मालक एकच असून त्यांनी पार्किंगच्या जागेत अनधिकृतरित्या दुकानाचे गाळे बांधले आहे.
सदनिका खरेदी करण्यापूर्वी मानलवार यांना विचारणा केली असता विक्री झाल्यानंतर पार्कीग मोकळी करुन दिली जाईल, असे सांगितले होते. पण, आता विक्री झाल्यानंतर मानलवार हे पार्कीगची जागा मोकळी करुन देण्यासाठी नकारघंटा वाजवित आहे.
त्यामुळे सदनिकाधारकांनी हक्काची पार्किंगची जागा मिळावी याकरिता जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलिसांनाही तक्रार दिली असून योग्य कारवाई करण्याची मागणी पी.टी.पांडे, विशाल उराडे, दीपक देशमुख, माधव शेरकुले व अमोल जिभकाटे या सदनिकाधारकांनी केली आहे.
सदनिकाधारकांच्या जीवितास धोका
कारला चौकात मे.पवनसुत पेट्रोलियम एजन्सीचा पेट्रोल व डिझेल पंप आहे. या एजन्सीच्या मालकाने पेट्रोलपंपावर विक्री होणाऱ्या इंजिन ऑईलचा साठा या हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेवर बांधलेल्या गाळ्यामध्ये ठेवला आहे. यासंदर्भात कुठलीही परवानगी घेतली नाही तसेच सदनिकाधारकांना माहितीही दिली नाही. या ज्वलनशील पदार्थामुळे सदनिकाधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अपार्टमेंट मालकाने सदनिकाधारकांकडून मोठी रक्कम घेऊनही त्यांच्या जीविताशी खेळ चालविल्याने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.