धनादेश अनादरप्रकरणी दोन वर्षे सश्रम कारावास
By Admin | Updated: March 4, 2016 02:15 IST2016-03-04T02:15:16+5:302016-03-04T02:15:16+5:30
धनादेश अनादर प्रकरणी येथील साई ट्रेडर्सचे प्रोप्रायटर ब्रिजरतन गोविंददास मोहता यांना न्यायदंडाधिकारी यु.एन. पाटील यांनी दोन वर्षांचा सश्रम कारावास ...

धनादेश अनादरप्रकरणी दोन वर्षे सश्रम कारावास
मोहताची जामिनावर सुटका : दंडाच्या एक चतुर्थांश रकमेचा भरणा करण्याचा आदेश
हिंगणघाट : धनादेश अनादर प्रकरणी येथील साई ट्रेडर्सचे प्रोप्रायटर ब्रिजरतन गोविंददास मोहता यांना न्यायदंडाधिकारी यु.एन. पाटील यांनी दोन वर्षांचा सश्रम कारावास व ८ लाख ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला पुन्हा सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा देत तात्काळ तुरुंगात रवानगी केली.
थोडक्यात हकीगत अशी की, येथील साई ट्रेडर्सचे संचालक ब्रिजरतन गोविंददास मोहता (४८) रा. जगन्नाथ वॉर्ड यांनी विदर्भ नागरी सहकारी पतसंस्था, हिंगणघाटकडून १ लाख २५ हजारांचे कर्ज १९९८-९९ मध्ये घेतले होते. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या पतसंस्थेला त्याने १८ आॅक्टोबर २००८ रोजी ४ लाख २५ हजारांचा विदर्भ मर्चंट अर्बन सहकारी बॅँक हिंगणघाटचा धनादेश दिला होता. तो पतसंस्थेने बॅँकेत जमा केला; पण त्यापूर्वीच त्याने बॅँकेचे खाते बंद केल्याने धनादेश अनादरीत झाला. याबाबत नोटीस पाठवूनही पतसंस्थेला धनादेशाची रक्कम मोहता याने दिली नाही. यामुळे पतसंस्थेने २००९ मध्ये त्याच्याविरूद्ध येथील फौजदारी न्यायालयात धनादेश अनादर प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती.
त्या प्रकरणात फिर्यादीतर्फे पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल शेगोकर आणि विदर्भ मर्चंट बॅँकेचे व्यवस्थापक रितेश पिपलवा यांची साक्ष नोंदविण्यात आली तथा आरोपीच्यावतीने स्वत: ब्रिजरतन मोहता याने आपली साक्ष दिली. आरोपी मोहता याने या प्रकरणात फिर्यादी पतसंस्थेचे बनावट धनादेश तयार करून त्याच्यावर कर्ज नसतानाही खोटे प्रकरण दाखल केल्याचा बचाव घेतला होता. एवढेच नव्हे तर, त्याने फिर्यादी संस्थेच्या १३ संचालक आणि व्यवस्थापकाविरूद्ध भादंविच्या कलम १९१, १९२, १९३, १९६, १९९, २००, ४२०, ४५६, ४६८, ४६९, ४७१, ४७२, ४७३, ४७४ तसेच कलम १५६ (३) फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार वेगळे प्रकरणही न्यायालयात दाखल केले होते.
न्यायाधीश पाटील यांनी दोन्ही पक्षांचा साक्ष, पुरावा विचारात घेऊन आणि उभय पक्षांच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून आरोपी मोहता याला धनादेश अनादर प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा ठोठावली. आरोपी मोहता याने वरील विविध कलमांतर्गत दाखल केलेले पतसंस्थेच्या संचालक आणि व्यवस्थापकाविरुद्धचे प्रकरण येथील दुसरे तदर्थ न्यायाधीश नेरकर यांनी खारीज केले. फिर्यादी पतसंस्थेच्यावतीने अॅड. एस.एन. ढगे यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)