देशातील नागरिकांना गंडा घालणारे दोघे वर्धा पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 07:27 PM2019-03-01T19:27:30+5:302019-03-01T19:27:39+5:30

विविध आमिष देऊन नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून आपल्या बँक खात्यात पैसे टाकून घेणाऱ्या ठगबाजांच्या टोळीतील दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले.

Two Wardha police in the custody of the citizens of the country | देशातील नागरिकांना गंडा घालणारे दोघे वर्धा पोलिसांच्या ताब्यात

देशातील नागरिकांना गंडा घालणारे दोघे वर्धा पोलिसांच्या ताब्यात

Next

वर्धा : विविध आमिष देऊन नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून आपल्या बँक खात्यात पैसे टाकून घेणाऱ्या ठगबाजांच्या टोळीतील दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले. या दोघांनी दिल्ली येथे बनावट कॉल सेंटर सुरू करून त्याच कॉल सेंटरच्या माध्यमातून देशातील विविध भागातील नागरिकांना सुमारे २ कोटींनी गंडा घातला आहे. राहूल सुजनसिंग यादव (२२) रा. कन्नोज उत्तर प्रदेश व पंकज जगदीश राठोड (२८) रा. दिल्ली, असे अटकेतील आरोपींची नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी एकूण ६.३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, स्थानिक हवालदारपुरा येथील वृषभ करंडे याला अज्ञात व्यक्तीने फोन करून खोटी बतावणूक करीत त्याची ३.६० लाखांची फसवणूक केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच स्था.गु.शा. व रामनगर पोलीस यांनी समांतर तपास केला. याच दरम्यान खात्रिदायक माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या एका चमूने दिल्ली गाठली. तेथे सात दिवस आवश्यक माहिती गोळा करून या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राहूल यादव व पंकज राठोड याला ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून त्यांच्याकडून पोलिसांनी बनावट कॉल सेंटरमधील मोबाईल, संगणक, राऊटर इतर साहित्य असा एकूण ६ लाख ३ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, छाया तेलघोटे, कुलदीप टांकसाळे, कुणाल हिवसे, अनुप कावळे, जगदीश डफ, दिनेश बोथकर, निलेश कट्टोजवार, अक्षय राऊत, अभिजीत वाघमारे, आनंद भस्मे, दिवाकर परिमल, मुकेश येल्ले यांनी केली.

कॉल सेंटरमध्ये १५ जणांना ठेवले होते कामावर
देशातील अनेक भागातील नागरिकांना आपला जाळ्यात अडकविण्यासाठी पंकज राठोड व राहूल यादव या महाठगांनी त्यांच्या दिल्ली येथील बनावट कॉल सेंटरमध्ये सुमारे १५ जणांना दहा ते बारा हजार रुपये वेतनावर कामावर ठेवले होते. यात सर्वाधिक महिलांचा समावेश होता असे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.

प्रत्येक दोन महिन्यांनी बदलवायचे सिमकार्ड
पंकज राठोड हा या बनावट कॉल सेंटरचा मालक तर राहूल यादव हा मॅनेजर म्हणून काम सांभाळत होता. या दोन्ही ठगबाजांकडून नागरिकांना ज्या फोनवरून संपर्क साधला जात होता त्या मोबाईलमधील सिमकार्ड प्रत्येक दोन महिन्यांमध्ये बदलविले जात असले.

बँक खाते घ्यायचे भाड्याने
सदर प्रकरणातील आरोपी एखाद्या गरजुला हेरून त्याला थोडासा मोबदला देत त्याचे बँक खाते भाड्यानेच घेत होते. याच बँक खात्यांमध्ये आमिषाच्या जाळ्यात अडकलेल्यांना पैसे टाकण्याचे सांगितल्या जात होते.

पंकज राठोड व राहूल यादव यांना आम्ही दिल्ली येथून ताब्यात घेत त्यांच्याकडून एकूण ६.३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ते मोठ्या हुशारीने देशातील विविध भागातील नागरिकांना ठगवित होते. त्यांनी राजस्थान येथील काहींना फसविल्याचे आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. सदर दोघांनी आतापर्यंत नागरिकांना २ कोटींनी गंडा घातला आहे.
- निलेश ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक, स्था. गु. शाखा, वर्धा.

Web Title: Two Wardha police in the custody of the citizens of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक