दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: January 16, 2016 02:30 IST2016-01-16T02:30:58+5:302016-01-16T02:30:58+5:30
सावंगी येथील एका चहा कॅन्टीनमधून व्यावसायिक सिलिंडर व दोन जर्मनी गंज चोरीला गेले. मंगळवारी घडलेल्या या चोरीचा तपास करताना सावंगी (मेघे) पोलिसांच्या हाती...

दोन अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
तीन चोऱ्यांची कबुली : अन्य चोऱ्यांतील मुद्देमालही जप्त
वर्धा : सावंगी येथील एका चहा कॅन्टीनमधून व्यावसायिक सिलिंडर व दोन जर्मनी गंज चोरीला गेले. मंगळवारी घडलेल्या या चोरीचा तपास करताना सावंगी (मेघे) पोलिसांच्या हाती शुक्रवारी दोन अट्टल चोरटेच लागले. यात त्यांच्याकडून अन्य चोऱ्यांमधील मुद्देमालही जप्त करण्यात आला.
सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या गेटजवळील चहा कॅन्टीनच्या चारचाकी ठेल्यातून अज्ञात चोरट्याने एक व्यावसायिक सिलिंडर, दोन जर्मनी गर्ज, असा ४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याबाबत विठ्ठल दादाजी राऊत (५५) रा. सावंगी (मेघे) यांच्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीवरून सावंगी पोलिसांनी किसना विठ्ठल अमृतकर (५४) रा. सावंगी व हरेशलाल सुंदरलाल वधवानी (५३) रा. दयालनगर वर्धा यांना ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून व्यावसायिक सिलिंडर जप्त करण्यात आले. जर्मनी गंजाबाबत त्यांनी माहिती दिली नाही. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कोठडीमध्ये त्यांची कसून चौकशी केली असता ते अट्टल चोरटे असल्याचेच निष्पन्न झाले. त्यांनी अन्य गुन्ह्यांचीही कबुली दिली. यात राजेश बळवंत बावणकर रा. शिवनगर सावंगी (मेघे) यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी आलमारीतून सोन्याचे पॉलीश असलेली पोत व ४ हजार रुपये रोख, असा सहा हजार रुपयांचा ऐवज चोरल्याचे सांगितले. शिवाय अतुल वामन वाटकर रा. बोपापूर (दिघी) यांच्या सावंगी ते पालोती मार्गावर असलेल्या सलूनच्या दुकानातून एक एलईडी टीव्ही किंमत ११ हजार रुपये चोरल्याचेही कबुल केले. यावरून सावंगी पोलिसांनी किसना अमृतकर यांच्या घरातून सोन्याचे पॉलीश असलेली पोत किंमत २ हजार रुपये, एक हजार रुपये रोख, एलईडी टीव्ही, दोन गंज, एक व्यावसायिक सिलिंडर व चार घरगुती सिलिंडर असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विशाल दांडगे, जमादार प्रकाश नागापुरे, रामदास बिसणे, प्रदीप राऊत, विकास अवचट, संघसेन कांबळे, नवनाथ मुंडे, दीपक गेडे आदींनी पार पाडली.(कार्यालय प्रतिनिधी)