बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी दोघे अटकेत
By Admin | Updated: July 13, 2017 00:49 IST2017-07-13T00:49:05+5:302017-07-13T00:49:05+5:30
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बनावट सह्या वापरून जात, नॉनक्रिमिलीयरसारखे प्रमाणपत्र बनवून

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी दोघे अटकेत
गुन्हा दाखल : केंद्रावरील कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या बनावट सह्या वापरून जात, नॉनक्रिमिलीयरसारखे प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या केंद्राचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पथकाने पितळ उघडे केले. त्या केंद्रावरील सर्व साहित्य जप्त करीत केंद्र मालक व सहकाऱ्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
देवळी नगर परिषदेच्या बाजूला विनापरवाना सामूहिक सुविधा केंद्र सुरू होते. आकाश खंडाते याच्या मालकीच्या या केंद्राद्वारे दुसऱ्या ग्रामस्तरीय उद्योजकांचा परवाना वापरला जात होता. येथे एका दिवसात नागरिकांना सर्व बनावट सह्यांचे दाखले मिळत होते. मंगळवारी तहसीलदार भागवत यांच्याकडे एका प्रकरणात खोटे जात प्रमाणपत्र आले. त्यांनी संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता खंडाते याचे नाव समोर आले. भागवत यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना माहिती दिली. यावरून त्यांनी महाआॅनलाईनचे प्रतिक उमाटे व पथकाला तपासणीसाठी पाठविले. देवळी गाठत पथकाने सायंकाळी सदर केंद्रावर धाड टाकली. यात संगणकात सुमारे २ हजार प्रमाणपत्रे होती. तपासणीत बहुतांश प्रमाणपत्रांचे बारकोड खोटे आढळले. बनावट तथा पूर्वीच्या एसडीओंच्या सह्यांचे दाखले आढळले. रात्री १०.३० पर्यंत कागदपत्रे तपासल्यावर तलाठी व पोलिसांच्या हजेरीत संगणक, कागदपत्रे जप्त करून केंद्र सील केले. खंडाते व सहकारी धर्मपाल कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेत विविध कलम तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.