दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना अटक
By Admin | Updated: July 24, 2014 23:59 IST2014-07-24T23:59:28+5:302014-07-24T23:59:28+5:30
दुचाकी चोरून त्या विकण्याकरिता नाही तर केवळ हौस म्हणून फिरविणाऱ्या दोन चोरट्यांना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोनही चोरटे अल्पवयीन असून

दोन अल्पवयीन दुचाकी चोरांना अटक
वर्धा : दुचाकी चोरून त्या विकण्याकरिता नाही तर केवळ हौस म्हणून फिरविणाऱ्या दोन चोरट्यांना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोनही चोरटे अल्पवयीन असून त्यांच्याजवळून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी जगन्नाथ वॉर्ड येथील मोहम्मद अमीन अब्दुल गणी यांच्या घरासमोर ठेवलेल्या दोन दुचाकींची चोरी झाली होती. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना गुन्हे अन्वेषन विभागाच्या चमूला नांदगाव चौरस्त्यावर दोन युवक दुचाकीवर संंशयास्पद स्थितीत दिसून आले. पोलीस दिसताच या दोनही युवकांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग करून त्यांना नांदगाव मार्गावर असलेल्या बालाजी जिनिंगजवळ पकडण्यात आले. विचारपूस केली असता त्यांच्या जवळ असलेल्या दोन्ही दुचाकी जगन्नाथ वॉर्ड येथील असल्याचे समोर आले. त्यांना आणखी विचारणा केली असता त्यांनी शहरात काही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकाचे वय १७ तर दुसऱ्याचे वय १४ वर्षे असल्याचे समोर आले.
या कारवाईत त्यांच्याजवळून एमएच ३२ एफ ५४२७, एमएच ३२ एन ४५५६, एमएच ३२ जी २६८९, एमएच ३२ एच ७४९८ व एमएच ३२ एल ६१२० क्रमांकाच्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची किंमत एक लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर कारवाई ठाणेदार एम. बोडखे, सहायक निरीक्षक एस,एन. घोनमोडे यांच्यासह जमादार निलेश मेंढे, निरंजन वरभे, सुनील पांजळे, राजेंद्र हाडके यांनी केली. (प्रतिनिधी)