दोन चोऱ्यांत अडीच लाखांचा ऐवज लंपास
By Admin | Updated: March 29, 2017 00:50 IST2017-03-29T00:50:13+5:302017-03-29T00:50:13+5:30
शहरात कुलूपबंद घरांना हेरून चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे समोर येत आहे.

दोन चोऱ्यांत अडीच लाखांचा ऐवज लंपास
टोळी सक्रिय : नागरिकांत भीतीचे वातावरण
हिंगणघाट : शहरात कुलूपबंद घरांना हेरून चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याचे समोर येत आहे. शहरात दोन ठिकाणी बंद घर फोडून चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या दोनही चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यात अडीच लाखांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. यातील एक घटना संत तुकडोजी वॉर्ड येथे मंगळवारी सकाळी उघड झाली तर संत ज्ञानेश्वर वॉर्डातील दुसरी घटना रविवारी रात्री उघड झाली.
संत तुकडोजी वॉर्ड येथील प्रवीण हिरामन कापसे हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने घराचे कूलप तोडून घरात प्रवेश केला. त्याने घरातील आलमारीतील तीन सोनसाखळ्या, चांदीचे दोन गोफ, सोन्याच्या दोन अंगठ्या, कानातले, सोन्याची पोत, तोरड्या असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
प्रवीण कापसे हे मंगळवारी परतले असता त्याच्या घरी चोरी झाल्याचे समोर आले. त्यांनी याची तक्रार पोलिसात केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.(तालुका प्रतिनिधी)
सोन्याच्या ऐवजासह रोख लंपास
हिंगणघाट - घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने घरात शिरून सोन्या चांदीच्या ऐवजासह रोख रकमेवर हात साफ केला. यात चोरट्याने ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना संत ज्ञानेश्वर वॉर्डात उघड झाली. या प्रकरणी हर्षल दिलीप धोटे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार, दिलीप धोटे हे संपूर्ण परिवारासह गिरड येथे पारिवारीक कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गेले होते. हिच संधी चोरट्यानी साधून चोरट्याने दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. शयनगृहातील कपाट उघडून त्यातील ५१ हजार रुपयाचें सोन्याचे दागदागिनी व ७ हजार रुपये रोख असा एकूण ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. धोटे कुटुंबिय रात्री घरी परतल्यानंतर सदर प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्वरित पोलीस ठाण्यात माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हर्षल दिलीप धोटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार साळवी यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.(शहर प्रतिनिधी)