दोन लाखांचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: May 10, 2015 01:41 IST2015-05-10T01:41:24+5:302015-05-10T01:41:24+5:30
वाहनाचा पाठलाग करून सेवाग्राम पोलिसांनी पवनार येथे चिंतामणी मंदिराजवळ देशी दारूच्या १९२..

दोन लाखांचा दारूसाठा जप्त
पवनार : वाहनाचा पाठलाग करून सेवाग्राम पोलिसांनी पवनार येथे चिंतामणी मंदिराजवळ देशी दारूच्या १९२ तर विदेशी दारूच्या १२० बॉटल, एक कार, एक दुचाकी व दोन मोबाईल आदी साहित्यासह हृषीकेश कोराम (२०) व पंकज नेहारे (२५) यांना ताब्यात घेतले़
या कारवाईत दारूसह १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोन ते तीन दिवसापासून सेवाग्राम पोलीस सदर गाडीवर पाळत ठेऊन होते़ मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. पोलीस सूत्रानुसार, रात्रीच्या वेळी पंकज नेहारे हा कारमध्ये दारू घेऊन चालला होता तर हृषीकेश कोराम हा कारच्या पुढे दुचाकीने येत होता. दरम्यान आपल्या मागावर पोलीस असल्याचे दोघांच्याही लक्षात आले. त्यामुळे पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करीत हृषीकेशने पंकजला गाडी फिरविण्याची सूचना केली. परंतु पोलिसांच्या सर्तकतेमुळे दोघांनाही मुद्देमालासह अटक करण्यात आली.
दारूबंदी महिला मंडळ स्थापन झाल्याने आधीच पवनार येथे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही प्रमाणात चोरून लपून दारू विकणे सुरूच आहे. पोलीस प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे दारू बंद होण्यास मदत होईल, अशी गावात चर्चा आहे़ ऋषिकेश कोराम व पंकज नेहारे यांची आर्थिक स्थिती बघता सदर दारू ही त्यांची नसल्याचे निदर्शनास येत आहे.
याप्रकरणाची कारवाई सेवाग्रामचे ठाणेदार पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात जमादार नरेंद्र डहाके, प्रदीप राऊत, विकास अवचट, नवनाथ मुंडे, संघसेन कांबळे यासह आदींनी पार पाडली़(वार्ताहर)