शुभांगीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:46 IST2018-04-11T23:46:06+5:302018-04-11T23:46:06+5:30
सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील शुभांगी उईके हिचा धपकी शिवारातील रेल्वे रूळावर विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप आई-वडील व आदिवासी संघटनांनी केला.

शुभांगीच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील शुभांगी उईके हिचा धपकी शिवारातील रेल्वे रूळावर विवस्त्र मृतदेह आढळून आला होता. ती आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप आई-वडील व आदिवासी संघटनांनी केला. या प्रकरणी तपास सुरू आहे. तत्पूर्वी गरीब कुटुंबाला मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाख रुपये मिळवून देण्यात आलेत. खा. रामदास तडस, आ.डॉ. पंकज भोयर व आ. समीर कुणावार यांच्या हस्ते सदर धनादेश बुधवारी शुभांगीच्या आई-वडिलांना सोपविण्यात आला.
यावेळी जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, सभापती सोनाली कलोडे, विनोद लाखे, मिलिंद भेंडे, सरस्वती मडावी, अशोक कलोडे, राजू मडावी, अरुण उरकांदे, डॉ. सुरेश धंदरे, अरविंद धंदरे, चेतन पेंदाम, दहेगावचे उपसरपंच सुरेंद्र तिवाडे, डॉ. इरशाद शेख, उमेश राऊत आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शुभांगीच्या आईने आपले मत व्यक्त करताना, माझा पोलीस तपासावर मुळीच विश्वास राहिलेला नाही. कोणत्याही मुलीवर असा प्रसंग भविष्यात उद्भवू नये म्हणून दोषींना गजाआड करा. याशिवाय तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. हा लढा आम्ही पैशासाठी नव्हे तर न्यायासाठी देत आहोत, असे सांगितले. सोबतच पोलिसांकडून तपास काढून घेत हे प्रकरण सीआयडीकडे सोपवून छडा लावावा. एवढीच मदत सर्वांकडून अपेक्षित आहे, असे मतही व्यक्त केले. खासदार, आमदार यांनी त्यांच्या भावना जाणून घेत सांत्वना केली. तुमच्या कुटुंबीयांना जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत या लढ्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत, असेही खासदार, आमदारांनी आवर्जून सांगितले.