चार अपघातांत दोघांचा मृत्यू; पाच गंभीर
By Admin | Updated: May 21, 2016 02:08 IST2016-05-21T02:08:37+5:302016-05-21T02:08:37+5:30
जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.

चार अपघातांत दोघांचा मृत्यू; पाच गंभीर
सेलू, देवळी, सेवाग्राम व सेलडोह येथे अपघात
वर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. यात सेलू, देवळी, सेवाग्राम व सेलडोह येथील घटनांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर तिघे जखमी झाले. सेलू येथील अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सेवाग्राम आणि देवळी येथील अपघातात प्रत्येकी एक जण जखमी झाला.
नागपूर-वर्र्धा मार्गावर सेलडोह नजीक भरधाव टँकरने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री झाला. श्रीकांत शंकर बिजवार (५०) रा. गांधीनगर, वर्धा असे मृतकाचे नाव आहे. राजेंद्र काळे रा. स्टेट बँक कॉलनी, रवी वंजारे रा. केळकरवाडी व वसंत माहुरे रा. गजानन नगर वर्धा अशी जखमीची नावे आहेत.
पोलीस सूत्रानुसार, नागपूरकडून वर्धेकडे जाणाऱ्या एम.एच.३२ सी. ४१८६ या कारला वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच. ०६- ए.सी. ४७७६ या टँकरने जबर धडक दिली. यात कारमधील श्रीकांत बिजवार यांचा मृत्यू झाला तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयाकडे रवाना केले.
घटनेची माहिती मिळताच सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत मोहर्ले, पोलीस अधिकारी आकाश शाही, कर्मचारी चंद्रकांत मेघरे, निलेश सडमाके यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस कर्मचाऱ्यांनी टँकर चालकास ताब्यात घेत पंचनामा करीत अपघातग्रस्त वाहनही ताब्यात घेतले. या घटनेची सिंदी (रेल्वे) पोलिसांनी नोंद घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)