दोन कारवाईत ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
By Admin | Updated: May 20, 2016 01:55 IST2016-05-20T01:55:15+5:302016-05-20T01:55:15+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी सापळा रचत ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोन कारवाईत ७.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : पवनार व नालवाडी येथे रचला होता सापळा
वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी सापळा रचत ७ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात चार जणांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले. यात एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. ही कारवाई गुरूवारी पवनार आणि नालवाडी येथे करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या पथकाला अनुप शेंडे रा. अशोकनगर वर्धा हा साकी बार, वडगाव येथून वाहन क्र. एमएच-३२ वाय १५९४ ने त्याच्या साथीदारासह बियर आणत असल्याची माहिती मिळाली. यावरून वर्धा-नागपूर मार्गावर पवनार येथे सापळा रचण्यात आला. यात सदर गाडी अडविण्यात आली. या वाहनाची झडती घेतली असता २८ पेट्या बियर आढळून आली. यावरून पोलिसांनी बियर, २ मोबाईल व वाहन असा ७ लाख ३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात अनुप आनंद शेंड े(३२) व हरीशचंद्र विठ्ठल थूल (५२) दोन्ही रा. अशोकनगर यांना अटक करण्यात आली. शिवाय बारमालक किशोर कृपलानी व पंकज नामक बार मॅनेजर यांच्याविरूद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी कारवाई नालवाडी येथे करण्यात आली. पुलफैल येथील अनिकेत काळे हा वडगाव येथून येथून दुचाकी क्र. एमएच-३२ एक्स ११४३ ने त्याचे साथीदारासह बियर आणत असल्याची माहिती मिळाली. यावरून नागपूर रोडवर नालवाडी येथे सापळा रचण्यात आला.
सदर वाहन अडविले असता २ पेट्या बियर आढळून आली. यावरून बियर व वाहन असा ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात आरोपी अनिकेत सदानंद काळे (१९) रा. पुलफैल आणि एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक ए.एम. जिट्टावार यांच्या निर्देशानुसार स.फौ. अशोक साबळे, नामदेव किटे, राजेंद्र ठाकुर, दीपक जाधव, वैभव कट्टोजवार, हरीदास काकड, दिनेश बोथकर, कुलदिप टांकसाळे, स्वप्नील भारद्वाज, रामा इंगळे, अनूप कावळे, अक्षय राऊत, विलास लोहकरे यांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)