विजय जळीतप्रकरणी दोघा भावंडाना दहा वर्षे कारावास
By Admin | Updated: December 20, 2014 01:55 IST2014-12-20T01:55:28+5:302014-12-20T01:55:28+5:30
वायगाव (निपाणी) येथे घरगुती वादातून अंगावर रॉकेल टाकत विजय ढोबळे याला जिवंत जाळल्याप्रकरणी प्रल्हाद रामभाऊ ढोबळे व दिवाकर रामभाऊ ढोबळे ...

विजय जळीतप्रकरणी दोघा भावंडाना दहा वर्षे कारावास
वर्धा : वायगाव (निपाणी) येथे घरगुती वादातून अंगावर रॉकेल टाकत विजय ढोबळे याला जिवंत जाळल्याप्रकरणी प्रल्हाद रामभाऊ ढोबळे व दिवाकर रामभाऊ ढोबळे या दोघा भावंडाना दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी शुक्रवारी दिला. या दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आणि प्रत्येकी १० हजार रुपये मृतकाची पत्नी कविता विजय ढोबळे हिला कॅम्पेंसेशन देण्याचा आदेश दिला.
घटनेची थोडक्यात हकीगत अशी की, दोन्ही प्रल्हाद व दिवाकर तसेच त्यांची आई बेबीबाई हे तिघे वेगळे राहत होते. विजय ढोबळे हा त्याच्या पत्नीसह वायगाव (नि.) येथे वास्तव्यास होते. १३ एप्रिल २०१३ रोजी दुपारी ३.३० वाजता विजयने त्याची आई बेबीबाईला विजेचे बिल भरल्यानंतर वीजपुरवठा देण्याची मागणी केली. यावरून तिने विजयला शिवीगाळ केली. नंतर प्रल्हाद आणि दिवाकर यांनी काठीने विजय व त्याची पत्नी कविताला मारहाण केली. यावेळी दिवाकरने विजयचे दोन्ही हात पकडून ठेवले व प्रल्हादने विजयच्या अंगावर रॉकेल टाकून त्याला पेटविले. विजयच्या पत्नीने वायगाव पोलीस चौकीत तक्रार केली असता पोलिसांनी त्याला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करून त्याचे मृत्यूपूर्व बयान नोंदवले. या बयानावरून देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.५९/१३ अंतर्गत भादंविच्या कलम ३०२,३४ अन्वये गुन्हा नोंदविला. तपास करून प्रकरण न्यायप्रवीष्ट केले. न्यायालयाने साक्षपुराव्याच्या आधाराने उपरोक्त निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अॅड. अनुराधा सबाने यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)