दोन मोठे व तीन मध्यम प्रकल्प कोरडे

By Admin | Updated: May 31, 2016 01:54 IST2016-05-31T01:54:00+5:302016-05-31T01:54:00+5:30

जिल्ह्यात पाणी टंचाईची भयावह स्थिती नाही. असे असले तरी आजच्या स्थितीत जिल्ह्याला पाणी पुरविण्याकरिता

Two big and three medium projects dry | दोन मोठे व तीन मध्यम प्रकल्प कोरडे

दोन मोठे व तीन मध्यम प्रकल्प कोरडे

वर्धा : जिल्ह्यात पाणी टंचाईची भयावह स्थिती नाही. असे असले तरी आजच्या स्थितीत जिल्ह्याला पाणी पुरविण्याकरिता सहायक ठरत असलेल्या १५ पैकी पाच प्रकल्प कोरडे झाले आहे. यात नांद व लालनाला या दोन मोठ्या तर पंचधरा, पोथरा व मदन उन्नई या पाच प्रकल्पांचा समावेश आहे. इतर जलाशयाचा जलसाठाही आता तळ गाठत असल्याचे दिसून आले आहे.
सध्या जलसाठा उपलब्ध असलेल्या १० जलाशयात सरासरी केवळ ८.६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. वर्धा शहरासह तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्ये सध्या ६.६५ दलघमी म्हणजेच केवळ ११.१८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. या धरणातील पाणी पिण्याकरिता राखीव असून पावसाळा प्रारंभ होईपर्यंत नागरिकांची तहान भागविली जाऊ शकेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली; मात्र पाऊस येण्यास विलंब झाल्यास नागरिकांवर पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
वर्धा जिल्ह्यात व जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या यवतमाळ तसेच अमरावती जिल्हा अशा एकूण १५ प्रकल्पात असलेल्या पाण्याचा लाभ जिल्ह्याला होत आहे. या धरणांतून सिंचन, उद्योग आणि पिण्याकरिता जलसाठा राखीव केला जातो. उन्हाळ्यामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे आणि शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी म्हणून जलसंचय केला जातो; पण दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने संचित जलसाठाही अपुरा ठरताना दिसतो. या १५ प्रकल्पांपैकी नांद व लालनाला हे दोन मोठे तर पोथरा, पंचधारा व मदन उन्नई हे तीन मध्यम प्रकल्प पूर्णत: कोरडे पडले आहेत.
एकाच वेळी पाच प्रकल्प कोरडे पडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. वर्धा शहर आणि तालुक्यातील गावांना तसेच धाम नदी काठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पातील पाणीही तळ गाठत आहे. या प्रकल्पात केवळ ६.६५ दलघमी जलसाठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील अन्य प्रकल्पांमध्येही उपयुक्त जलसाठ्यात कमालीची घट झाली आहे. यामुळे कारंजा (घा.), आर्वी, समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यातील काही गावांतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विहिरींनीही तळ गाठल्याने अनियमित पाणी पुरवठा होताना दिसतो. शिवाय अन्य सार्वजनिक विहिरी व हातपंपांची भूजल पातळी खालावली आहे.
वर्धा तालुक्यातील सेवाग्राम, आर्वी तालुक्यातील रसुलाबाद, समुद्रपूर व पुलगाव शहरातील काही भाग, हिंगणघाट तालुक्यातील धोची, कारंजा तालुक्यातील मोर्शी यासह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून ती वाढतच आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Two big and three medium projects dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.