दयालनगर घरफोडीप्रकरणी दोघे अटकेत

By Admin | Updated: November 30, 2015 01:58 IST2015-11-30T01:58:26+5:302015-11-30T01:58:26+5:30

येथील दयालनगर परिसरातील प्रेमचंद हिराणी यांच्या घरून चोरट्यांनी २४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार शहर पोलिसात झाली.

Two arrested in connection with the Dayanagar incident | दयालनगर घरफोडीप्रकरणी दोघे अटकेत

दयालनगर घरफोडीप्रकरणी दोघे अटकेत

१४.२४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : ४८ तासांत लागला चोरीचा छडा
वर्धा : येथील दयालनगर परिसरातील प्रेमचंद हिराणी यांच्या घरून चोरट्यांनी २४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार शहर पोलिसात झाली. या चोरीचा छडा लावण्यात वर्धा पोलिसांना यश आले असून त्यांच्याकडून चोरीच्या ऐवजातील एकूण १४ लाख २४ हजार २६० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शैलेंद्र ऊर्फ सिलेंडर महेंद्र तिरपुडे (२६) रा. सेवाग्राम व संघपाल दशरथ वैद्य (२८) रा. स्टेशन फैल असे अटकेत असलेल्यांची नावे आहेत.
चोरी झाली त्याचक्षणी पोलिसांनी चोरीच्या प्रकारावरून संशयित म्हणून शैलेंद्र तिरपुडे याला ताब्यात घेण्याची योजना आखली होती. त्याला ताब्यात घेताच या चोरीचा छडा लागला होता. या प्रकरणात त्याला हिराणी याच्या घराशेजारी राहणाऱ्या संघपाल वैद्य याने मदत केल्याचे समोर आले आहे. अटकेत असलेल्या दोघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली असून उर्वरीत तपासाकरिता दोघांनाही शहर ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
२५ नोव्हेंबर रोजी प्रेमचंद गिरधरलाल हिराणी (५७) हे बाहेरगावी नातेवाईकांकडे लग्न कार्याकरिता गेले होते. दरम्यान, ते २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुपारी आपल्या घरी परत आला असता त्यांना त्यांच्या घराचे दर्शनी भागाचे दार तोडलेले दिसले. त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील लाकडी आलमाऱ्या तोडून त्यातून १८ लाख रुपयांची रोकड आणि ६ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने, असा एकूण २४ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची तक्रार शहर ठाण्यात दिली. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना गुन्ह्याच्या पद्धतीवरुन शैलेंद्र ऊर्फ सिलेंडर महेंद्र तिरपुडे (२६) रा. सेवाग्राम याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला संघपाल दशरथ वैद्य (२८) रा. स्टेशन फैल, याने मदत केल्याचे सांगितले. या दोघांजवळून सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला व लपवून ठेवलेला नगदी ९ लाख ८९ हजार ५१० रुपये रोख व ४ लाख ३३ लाख ९५० रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच ८०० रुपयांच्या दोन मनगटी घड्याळी, असा ऐवज जप्त केला.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, सहायक उपनिरीक्षक अशोक वाट, उदय बारवाल, दिवाकर परिमल, अमर लाखे, समीर कडवे, आणि चालक भूषण पुरी यांनी केली.(प्रतिनिधी)

अशी झाली चोरी
हिराणी यांच्या घरी लग्नकार्य आहे. शिवाय ते घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असल्याची माहिती त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या संघपाल वैद्य याने शैलेंद तिरपुडे याला दिली. काही दिवसांपूर्वी संघपालने त्याची दुकाची पैशाकरिता एकाकडे ३० हजार रुपयात गहाण ठेवली होती. शैलेंद्र हा सराईत चोर असून तो संघपालचा मित्र आहे. यावरून दोघांनी परिसराची पाहणी २५ नोव्हेंबर रोजी रात्री चोरी करण्याचे ठरविले.
हे दोघे रात्री रेल्वे स्थानकाच्या देवळी मार्गावर बसले होते. अशात रात्री दोन वाजताच्या सुमारास त्यांनी रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या एका ट्रकमधून टिकास घेत हिराणी यांचे घर गाठले. येथे त्यांनी मुख्य द्वाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पहिल्या कपाटात त्यांना केवळ ६ हजार ५०० रुपये मिळले. तर वरच्या माळ्यावरील कपाटात त्यांना मोठी रक्कम मिळाल्याची कबुली या दोघांनी दिली.
चोरी झाल्यानंतर सकाळ होताच या दोघांनी सेवाग्राम येथून नांदोरा या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या एका निरुपयोगी असलेल्या शौचालयात चोरीचा ऐवज लपविल्याची माहिती पोलिसांना दिली.

Web Title: Two arrested in connection with the Dayanagar incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.