लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचे संकट गंभीर होत असतानाही जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच आपली तहानभूक विसरून खंबीरपणे लढा चालविला आहे. आता दीड वर्षापासून कोरोनासोबत दोन हात सुरू असूनही नियमांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांकडून वेळोवेळी मिळालेले सहकार्य, यामुळे अद्यापही तब्बल २२७ गावांमध्ये कोरोनाला वेशीवरच रोखून धरले आहे.जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री होण्यापूर्वीच प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्यात. १० मे २०२० रोजी आर्वी तालुक्यातील हिवरा (तांडा) येथील एका महिलेचा मृत्यूपश्चात कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने ‘अॅक्शन मोड’वर कामाला गती दिली. महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका व नगपंचायत प्रशासन आदींनी या कोरोना युद्धात स्वत:ला झोकून दिले आहे. पोलीस पाटील, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह शिक्षक आदी १५ लाख ७८ हजार लोकसंख्येच्या आरोग्यासाठी लढा देत आहे. अनेकांना कोरोनाची बाधा झाली तर काहींनी जीवही गमवला. शिथिलतेनंतर झालेला गाफीलपणा भोवल्याने जिल्ह्यातील १ हजार ३८७ गावांमध्ये कोरोनाला घरोबा करण्यास संधी मिळाली. तरीही तब्बल २२७ गावांमध्ये कोरोना वेशीवर येऊन थांबला असून त्याला अद्यापही गावात एंट्री मिळाली नसल्याने या गावांच्या नियोजनाला सलामच करावा लागेल.
आधी रुग्ण आढळला पण सध्या शुन्यावरग्रामीण भागातून कोरोनाचा शिरकाव झाला असला तरीही शहरी भागातच रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. बऱ्याच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले पण, त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे बहुतांश गावातील रुग्ण संख्या शुन्यावर असल्याचे दिसून येत आहे.
आरंभा आणि मांगली या दोन गावांमिळून गट ग्रामपंचायत असून दोन्ही गावातील लोकसंख्या पंधराशेच्या आसपास आहे. कोरोनाकाळात सुरुवातीला गावातून बाहेर जाणारे आणि बाहेर गावातून येणाऱ्यांवर लक्ष ठेवले. सोबतच जाणे-येणे टाळण्याचे नागरिकांना आवाहन केल्याने नागरिकांनी सहकार्य केले. गावात सॅनिटायरचा वापर, नियमित फवारणी केली. त्यासोबत आशा वर्कर्स यांचेही मोठे सहकार्य मिळाले. ईश्वर सुपारे, सरपंच, आरंभा
आमचे गाव वर्धा-यवतमाळ मार्गावर असून गावाची लोकसंख्या अडीच हजारावर आहेत. सुरुवातीला बाहेर गावावरुन येणाऱ्यांवर वॉच ठेवला. जिल्ह्यात पहिला दंड आम्ही वसूल केला. यवतमाळवरुन आलेल्या तिघांसह घरमालक अशा चौघांकडून आठ हजार रुपये दंड वसूल केला. आताही बारकाईने लक्ष ठेऊन शासनाच्या नियमावलीचे पालन केले जात असल्याने अद्यापही एकही रुग्ण आढळला नाही.रविंद्र भानारकर, सरपंच, शिरपूर (होरे)
तारासावंगा ग्रा.पं.मध्ये २ हजार २०० रुग्णसंख्या असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुरुवातीपासून विविध उपाययोजना करण्यात आल्या. प्रारंभी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांकरिता नाकाबंदी करण्यात आली होती. तसेच गावकऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. सामाजिक अंतर पाळण्यासोबतच मास्कचा नियमित वापर करण्यास नागरिकांना सूचित केले. परिणामी अद्याप गावात एकही व्यक्ती कोरोनाबाधित झालेला नाही.शीतल गोविंद खंडाळे, सरपंच, तारासावंगा