वळण रस्ता झाला धोक्याचा

By Admin | Updated: November 13, 2016 00:53 IST2016-11-13T00:53:06+5:302016-11-13T00:53:06+5:30

नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहतूक शहराबाहेरुन काढण्यासाठी वळणरस्ता तयार करण्यात आला.

Turn passage is dangerous | वळण रस्ता झाला धोक्याचा

वळण रस्ता झाला धोक्याचा

दुरुस्तीचे वावडे : खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळणी
वर्धा : नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहतूक शहराबाहेरुन काढण्यासाठी वळणरस्ता तयार करण्यात आला. अवजड वाहनांना थेट शहरातून प्रवेश न देता पवनार-वर्धा मार्गावरील दत्तपूर परिसरातून बायपास काढून वाहतूक वळती केली. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी झाला. जडवाहनांसह शहरातील वाहनधारकांकडून या रस्त्याचा उपयोग केला जातो. सध्या या मार्गावर वर्दळ वाढली आहे. मात्र या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली असून ही बाब अपघाताचे कारण ठरत आहे.
पूर्वी नागपूरवरून येणारी जडवाहने शहरातील मुख्य मार्गाने जात होती. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. ही अडचण दूर करण्यासाठी दत्तपूर परिसरातून बायपास मार्ग तयार करण्यात आला. या मार्गाने नागपूरवरून यवतमाळकडे जाणारी जडवाहने वळती करण्यात आली. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा भार कमी झाला. सध्या या मार्गावरून दररोज शेकडो जडवाहने धावतात. यासह रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरी वसाहतीतील वाहतूक येथूनच होते. दुचाकी व कार यासारख्या वाहनांची संख्या वाढली आहे. परिणामी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. मात्र त्याची डागडुजी केली नाही. त्यामुळे रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे. वळणरस्ता असल्याने वाहने भरधाव धावतात. अशात जडवाहनांचे चालक खड्ड्यांचा विचार करीत नाही. अनेकदा वाहनाचे टायर पंक्चर होतात. दुचाकी, कार या वाहनांचे चालक खड्ड्यांना चुकविण्याचा प्रयत्नात अपघात होतात.
या खड्ड्यांमुळे या मार्गाने रात्रीची होणारी वाहतूक धोकादायक झाली आहे.
जडवाहतुकीसह प्रवासी वाहतूकही या मार्गाने होते. अशावेळी या खड्ड्यांंमुळे प्रवाशांना यातनामय प्रवास करावा लागतो. प्रवाशांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांची दैना होते. याबाबत अनेकदा आंदोलने झालीत. रस्त्यावर बेशरमाची झाडेही लावण्यात आली होती. याउपरही संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही.(स्थानिक प्रतिनिधी)

रस्त्याच्या कडा खचल्याने वाहनांमध्ये होतो बिघाड
या वळणरस्त्याचा वापर शहरातील मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमातील उरलेले अन्न टाकण्यासाठी केला जातो. तसेच येथे कचरा टाकण्यात येतो. काही सामाजिक संघटनांनी येथे सफाई मोहीम राबविली. येथे कचरा कुंड्यांची व्यवस्था करण्यात आल्यानंतर हा प्रकार सुरू आहे.
हे शिळे अन्न खाण्यासाठी कुत्रे, गाय, म्हशी आदी जनावरे येथे भटकत असतात. अशावेळी एखादे भरधाव वाहन आल्यास नाहक ही जनावरे वाहनाखाली चिरडली जातात. परिसरात जनावरे सडल्याने दुर्गंधी पसरते.
या रस्त्याने ये-जा करताना परिणामी जनावरांना चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात झाले आहे.

या मार्गावर जुनापाणी चौक परिसरात रस्ता उखडला आहे. तसेच उर्वरीत भागात खोल खड्डे पडले आहे. रस्त्यावील खड्डे चुकविण्यासाठी जडवाहने रस्त्याच्या कडेने वाहन घेऊन जातात. परिणामी यात रस्त्याच्या कडा खचत आहे. रस्त्याची अत्यंत दैना झाली आहे.
उरलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकले जात असल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे असे अन्न टाकण्यासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाने या खड्ड्यांची त्वरीत डागडुजी करावी अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक करीत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात बळावले आहे.
या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती कोणाकडे आहे याबाबत संभ्रम असल्याने याची डागडुजी होत नसल्याचे दिसते. यासाठी निधी आला नसल्याचे सबंधीत विभागाकडून सांगण्यात येते.

Web Title: Turn passage is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.