बंद झालेली डागा मिल सुरू करा
By Admin | Updated: August 10, 2015 01:48 IST2015-08-10T01:48:42+5:302015-08-10T01:48:42+5:30
येथील डागा मिल २००९ पासून बंद करण्यात आली आहे. १८९० पासून शहराच्या मध्यभागी स्थापन झालेल्या या मिलमुळे अनेकांना रोजगार मिळाला होता.

बंद झालेली डागा मिल सुरू करा
नागरिकांचे साकडे : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
हिंगणघाट : येथील डागा मिल २००९ पासून बंद करण्यात आली आहे. १८९० पासून शहराच्या मध्यभागी स्थापन झालेल्या या मिलमुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. यामुळे मिल पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही पाठविण्यात आले आहे.
डागा मिल पूर्वी एकदा बंद पडली होता. त्यावेळी सदर मिल पूर्ववत चालू करून नॅशनल टेक्सटाईल्स कार्पोरेशनने आपल्या ताब्यात घेतली होती. या मिलमध्ये तीन ते चार हजार कामगार काम करीत होते. मिल अत्यंत चांगल्या प्रतीचे कापड तयार करीत होती. या मिलचा कापड संपूर्ण भारत व विदेशातही जात होता. बऱ्याच नागरिकांनी आपले जीवन या मिलमध्ये नोकरी करून घालविले. हिंगणघाट ही नगरी येथील मिलमुळे कामगार नगरी म्हणूनही ओळखली जाते. ही मिल सुरू असताना बरेच व्यापारी जिनिंग शहरात स्थापन झाले. २०१० मध्ये सर्व कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन या मिलचे उत्पादन पूर्णत: बंद करण्यात आले; पण मिल सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. सध्या मिलमध्ये २५ ते ३० कर्मचारी, सुरक्षा गार्ड व काही कामगार कार्यरत आहेत. ही मिल पूर्ववत चालू केल्यास हिंगणघाट व परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणे शक्य आहे.
पाच ते सात हजार नागरिकांच्या कुटुंबाला मिलमुळे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊ शकेल. आर्थिक स्थिती व बाजारपेठेवरही अनुकूल परिणाम होईल. या मिलची भरपूर जागा असून मागील बाजूस जिनिंग आहे. मिलला पूर्ण वास्तूवर लक्ष नसल्याने व काम बंद असल्याने अस्ताव्यस्त स्थिती आहे. देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर कापडाच्या उत्पादनास चांगली व व्यापक बाजारपेठ लाभली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल्स पार्कची निर्मिती राज्य व केंद्र सरकार करीत आहे. यामुळे कापूस उत्पादक, सूत व कापड विक्रीकरिता या बाबी पोषक ठरत आहे. विदर्भ कापूस उत्पादक प्रदेश आहे. या सर्व बाबी लक्षात घेत बंद अवस्थेत असलेली डागा मिल पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत श्याम इडपवार, उमेश नेवारे, प्रकाश तांबोळी, सतीश मसराम, भ्रमर रघाटाटे, किरण गहेरवार आदींनी मुख्यमंत्र्यांना निवेदन केले.(तालुका प्रतिनिधी)