तुकाराम वॉर्डात झंडीमुंडी जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 05:00 IST2020-08-18T05:00:00+5:302020-08-18T05:00:12+5:30
अवैध व्यावसायिकाकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणी तक्रार करण्यास धजावत नसल्याची माहितीही एका रहिवाशाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. या व्यवसायातूनच तुकाराम वॉर्डात एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दररोज हाणामारीच्या घटना घडतात. मात्र, रामनगर पोलीस अद्याप हप्ता वसुलीतच मश्गुल आहे.

तुकाराम वॉर्डात झंडीमुंडी जोरात
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पोळा सणाच्या पूर्वीपासून रामनगरातील संत तुकाराम वॉर्डात गावठी दारूविक्री आणि झंडीमुंडीचा खेळ जोरात असून रामनगर पोलीस याकडे ‘अर्थ’पूर्ण डोळेझाक करीत असल्याचा आरोप रहिवासी नागरिकांनी केला आहे. पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदेवाईकांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्डात देवी मंदिर परिसरात मागील काही दिवसांपासून गावठी आणि विदेशी दारू विक्रीला प्रचंड उधाण आले असतानाच आता झंडीमुंडीचा खेळ राजरोसपणे सुरू आहे. आंबटशौकिनांची येथे मोठी गर्दी उसळत असल्याने परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. या अवैध प्रकारामुळे मात्र, मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले असून रहिवासी नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात रामनगर ठाण्याचे पोलीस दररोज येत कारवाई न करता ‘लक्ष्मीदर्शन’ घेऊनच जातात. यामुळे झंडीमुंडीचा खेळ भरविणाऱ्या दारूविक्रेत्या युवकाचे मनोबल उंचावले आहे.
अवैध व्यावसायिकाकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याने कुणी तक्रार करण्यास धजावत नसल्याची माहितीही एका रहिवाशाने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर दिली. या व्यवसायातूनच तुकाराम वॉर्डात एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. दररोज हाणामारीच्या घटना घडतात. मात्र, रामनगर पोलीस अद्याप हप्ता वसुलीतच मश्गुल आहे. जिल्हा पोलीस विभागाचेही यावर नियंत्रण नाही. त्यामुळे दाद कुणाकडे मागायची, असा संतप्त सवाल तुकाराम वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. यापूर्वी ‘लोकमत’ने या अवैध व्यवसायाविषयी वृत्त प्रकाशित करूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता हप्ता वसुलीतच धन्यता मानली. झंडीमुंडी खेळ भरविणाºया दारूविक्रेता युवकाचे पोलिसांशी लागेबांधे असल्यानेच कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोपही तुकाराम वॉर्डातील नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एखादी हल्ल्याची घटना घडल्यास जबाबदार कोण? असा सवालही नागरिकांनी केला आहे. झंडीमुंडीचा डाव उधळून लावत या अवैध व्यावसायिकावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
देवी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप
संत तुकाराम वॉर्डात अनेक ठिकाणी दारूविक्रीचे अड्डे असून मद्यपींचा सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राबता असतो. दारूविक्रीचे पाट वाहत असतानाच देवी मंदिराच्या परिसरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत झंडीमुंडीचे येथे डाव रंगत आहेत. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांची येथे दिवसभर रेलचेल असते. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक अक्षरश: त्रस्त झाले आहेत. रामनगर ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी येथे येतात. मात्र, कुठलीही कारवाई करीत नाही. यामुळे रामनगर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
तुकाराम वॉर्डात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध दारूविक्री आणि झंडीमुंडी या खेळाविषयी यापूर्वी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्याला कारवाई करण्याबाबत सूचना देऊन कठोर कारवाई केली जाईल.
- डॉ. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक, वर्धा.