ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 12, 2016 01:58 IST2016-06-12T01:58:16+5:302016-06-12T01:58:16+5:30
ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून एक वर्षापूर्वी ‘आनंदी कट्टा’ची सुरूवात करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न
संध्या देशमुख : ‘आनंदी कट्टा’चा उपक्रम
वर्धा : ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून एक वर्षापूर्वी ‘आनंदी कट्टा’ची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमाचा वर्धापन दिन रविवारी साजरा होत आहे. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती मातृसेवा संघाच्या मातृमंदिर येथे आयोजित पत्र परिषदेत आनंदी कट्टाच्या अध्यक्ष संध्या देशमुख यांनी दिली.
ज्येष्ठांचा एकटेपणा दूर करण्यास्तव स्थापन आनंदी कट्टा या मंचाचा वर्धापन दिन रविवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे साजरा होत आहे. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबा देशमुख, जि.प. समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे उपस्थित राहतील. यात अजय हेडाऊ यांचा ‘शाम ए गझल’ हा कार्यक्रम आयोजित आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिक आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले.
आनंदी कट्ट्याच्या कलामंचावर सादर ज्येष्ठ कलाकारांना अन्य गावे, संस्था, शहरांत व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी विदर्भस्तरीय संमेलन घेण्यात येणार आहे. यात ज्येष्ठांचे एकत्रीकरण, विविध कलागुणांचे सादरीकरण, विविध खेळांच्या स्पर्धा आदी उपक्रम घेतले जातणार आहे. ज्येष्ठांच्या ज्ञान, गुण, उर्जेचा तसेच समृद्ध अनुभवाचा उपयोग नव्या पिढीसाठी करणे, यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयातून, सामाजिक सेवाभावी संस्थामधून त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. वर्षातून दोनदा हिवाळी व उन्हाळी शिबिरा विद्यार्थ्यांसाठी घेतले जातील. यात ज्येष्ठांच्या कलागुणांचा उपयोग करण्यात येणार आहे. झोपडपट्टी भागातील मुलांना विविध विषयाचे प्रशिक्षण ज्येष्ठांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. लिसनिंग सेशन अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना गाणी, थोर महान व्यक्तींच्या भाषणांच्या सी.डी. ऐकविल्या जातील. या उपक्रमांतून ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. पत्रपरिषदेला आनंदी कट्टाच्या अध्यक्ष संध्या देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, मातृसेवा संघाच्या अध्यक्ष पुष्पा देशमुख, शांता पावडे, भरत मेहता, वासुदेव गोंधळे, डॉ. भीमराव भोयर आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)