बाजार समितीत तिहेरी लढतीचे चित्र
By Admin | Updated: October 7, 2016 02:13 IST2016-10-07T02:13:45+5:302016-10-07T02:13:45+5:30
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता १८ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहे.

बाजार समितीत तिहेरी लढतीचे चित्र
प्रचार शिगेला : १३४२ मतदार ठरविणार उमेदवारांचे भाग्य
समुद्रपूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ८ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता १८ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात आहे. यात प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी संघटना असे मिळून माजी आमदार राजू तिमांडे यांचे पॅनल आहे. दुसरे आ. कुणावार व शफात अहमद यांचे परिवर्तन पॅनल तर तिसरे शिवसेना समर्पित पॅनल आहे. यामुळे तिहेरी लढत असून प्रचारातील रणधुमाळी माजली आहे.
१८ जागांपैकी ग्रा.पं. मतदार संघात ५५४ मतदार असून दोन जागा सर्वसाधारण, एक जागा दुर्बल घटक तर एक अनु. जाती, जमातीकरिता राखीव आहे. सेवा सहकारी मतदार संघात ६४३ मतदार असून ११ जागा आहे. यातील सात जागा सर्वसाधारण, दोन महिला राखीव, एक विमुक्त भटक्या जाती तर एक जागा इतर मागासवर्गासाठी राखीव आहे. अडते व्यापारी मतदार संघात ९६ मतदार असून ते दोन जागेवर व्यापारी व अडत्यांना निवडून देतील. हमाल व्यापारी मतदार संघात ४९ मतदार असून ते एक हमाल वा व्यापारी प्रतिनिधींना निवडून देतील.
सदर मतदार संघ संपूर्ण समुद्रपूर तालुक्यात व्यापला आहे. स्वत: आ. कुणावार व सहकार नेते शफात अहमद, किशोर दिघे, आनंदराव थुटे हे परिवर्तन पॅनलकरिता प्रचारात मेहनत घेत आहे. माजी आमदार तिमांडे, अॅड. कोठारी, व्यापारी असो.चे अध्यक्ष शांती गांधी हे प्रचारात उतरले आहे. शिवसेना समर्पित पॅनलकरिता माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र लढी, प्रमोद भटे यांनी स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे. तीनही गटाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. ८ आॅक्टोबरला उमेदवाराचे भाग्य पेटी बंद होणार आहे. या तिहेरी लढत काट्याची व अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)