बस, इनोव्हा व ट्रकचा तिहेरी अपघात
By Admin | Updated: March 13, 2015 02:04 IST2015-03-13T02:04:04+5:302015-03-13T02:04:04+5:30
येथील यशवंत चौकात तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

बस, इनोव्हा व ट्रकचा तिहेरी अपघात
सेलू : येथील यशवंत चौकात तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ आगाराची बस क्रमांक एमएच ४० वाय ५७४१ नागपूर-वर्धा-यवतमाळ ही स्थानिक यशवंत चौकात प्रवासी उतरविण्यासाठी रस्त्याच्या मधोमध उभी करण्यात आली. यामुळे तिच्या मागे येत असलेली इनोव्हा कार क्र. एमएच ३१ सीएस ९२०० ही बस जाण्याची वाट पहात थांबली. अशातच मागावून आलेला ट्रक क्र. एमएच ०४ जीएफ ८९८८ याने इनोव्हाला मागाहून जबर धडक दिली. त्यामुळे इनोव्हा कार उभ्या असलेल्या बसच्या मागील भागात जावून फसली. यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही; परंतु अपघात मात्र एवढा विचित्र झाला की बघणाऱ्यांची गर्दी जमा झाली.
अपघात स्थळापासून पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा पोलिसांना अपघात स्थळी पोहचण्यास एक तास लागला. सदर ठिकाणी वाहनांची नेहमीच गर्दी राहत असल्या कारणाने बसेस कुठेही उभ्या केल्या जातात. त्यामुळे वारंवार अपघात घडत असतात. स्थानिक चौकात दोन्ही बाजूंनी गतिरोधक लावावे, अशी मागणी वारंवार नागरिकांनी केली. (तालुका प्रतिनिधी)