एकीकडे तिरंगा यात्रा अन् दुसरीकडे राष्ट्रध्वज उभारणीला विरोध!
By Admin | Updated: August 19, 2016 02:05 IST2016-08-19T02:05:58+5:302016-08-19T02:05:58+5:30
एकीकडे खासदार जिल्ह्यात तिरंगा संवाद यात्रा काढून शहिदांचे जिल्हावासीयांना स्मरण करून देत आहे,

एकीकडे तिरंगा यात्रा अन् दुसरीकडे राष्ट्रध्वज उभारणीला विरोध!
काँग्रेस नगरसेवकांचा आरोप : वर्धा पालिकेचे १० कोटी केले वळते, आमदारांनी सुचविलेलीच कामे होणार
वर्धा : एकीकडे खासदार जिल्ह्यात तिरंगा संवाद यात्रा काढून शहिदांचे जिल्हावासीयांना स्मरण करून देत आहे, तर दुसरीकडे वर्धेतील भाजप आमदार व नगरसेवक वर्धेची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेल्या ४० मीटर उंचीच्या राष्ट्रध्वाजाला विरोध करतात. इतकेच नव्हे, तर नगर पालिकेचा १० कोटी रुपयांचा हक्काचा निधीही आमदार महोदयांनी परस्पर वळता केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवारी येथील सद्भावना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
एकूणच राष्ट्रध्वजाची भव्य उभारणी आणि पालिकेच्या वळता केलेल्या निधीवरुन वर्धेतील राजकारणात नवा रंग भरला जात आहे.
चंद्रशेखर खडसे म्हणाले, वर्धा ही महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी आहे. या शहरातील प्रताप नगरातील इंदिरा गांधी उद्यानात २४ तास फडकत राहणारा तब्बल ४० मीटर उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात यावा, ही बाब वर्धेसाठी गौरवास्पद ठरणार, असा प्रस्ताव नगरसेवक प्रफुल्ल शर्मा यांनी नगर पालिकेच्या १५ जून २०१५ रोजी सर्वसाधारण सभेत ठेवला होता. त्यावेळी तो मंजुरही झाला. या राष्ट्रध्वजासाठी सुरुवातीपासूनच भाजपच्या नगरसेवकांचा विरोध होता, असा आरोप खडसे यांनी केला.
राष्ट्रध्वज उभारणीसाठी सुमारे २५ लाख रुपयांचा निधी अपेक्षित होता. पालिकेची आर्थिक स्थिती नाजुक असल्यामुळे निधीची अडचण पुढे आली. राज्य शासनाने उद्याने व क्रीडांगण निर्मितीच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्णचा ४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये १० टक्के पालिकेचा सहभाग आवश्यक होता. या अनुषंगाने पालिकेची सभा झाली. त्यात सर्व १० ही प्रभागातील उद्याने विकसित करण्यासाठी सभागृहाने कामनिहाय अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. यामध्ये ४० मीटरचा राष्ट्रध्वज उभारणीसाठी २५ लाखांची आणि उद्यानाच्या उर्वरित कामांसाठी १० लाख, अशी ३५ लाखांची तरतूद करण्यात आली. हे सोपस्कार पार पाडल्यानंतर तांत्रिक अहवालासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे प्रस्ताव पाठविला. अहवाल प्राप्त झाला. यासाठी ५ लाख ९ हजार रुपये शुल्कही जमा करण्यात आले. दरम्यान, २५ जुलै २०१६ रोजी राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वैशिष्टपूर्ण/विशेष रस्ता/नगर पंचायत योजनेंतर्गत वर्धा नगर परिषद व सेलू नगर पंचायतीला वितरीत केलेल्या निधीअंतर्गत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी सुचविलेली कामे घेण्यात यावी, असे आदेश दिले गेले. यापद्धतीने सुमारे १० कोटींचा पालिकेचा निधी परस्पर वळता केला गेला. परिणामी वर्धेत २४ तास सन्मानाने फडकत राहणाऱ्या राष्ट्रध्वाजाच्या उभारणीला खीळ बसली, असा गंभीर आरोपही खडसे, नगरसेवक प्रफुल्ल शर्मा यांच्यासह अन्य नगरसेवकांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला काँग्रेसचे गटनेता सोहनसिंग ठाकूर, सुशील धोपटे, शिलाताई गुजर, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी सुनील कोल्हे, माजी नगरसेवक निलेश खोंड, मनीष गंगमवार यांची उपस्थिती होती.(जिल्हा प्रतिनिधी)
निधी वळता करण्यासाठी आमदाराचे शासनाला पत्र
वर्धा शहराकरिता वैशिष्टपूर्ण येणारे नवीन उद्यान व क्रीडांगण त्वरीत करण्याकरिता देण्यात आलेला निधी अन्य कामांकरिता वितरीत करण्यात यावा, असे पत्र आ. डॉ. पंकज भोयर यांनी ९ जून २०१६ रोजी राज्याच्या नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांना पाठविले होते. या पत्राची शासनाने दखल घेतली, असा आरोपही यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला.
विशेष रस्ता अनुदानामध्ये आपण सुचविलेली कामे करण्यात यावी, असे पत्र आ. डॉ. पंकज भोयर यांनी जुलै २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले होते. यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या घरालगतच्या रस्ते व अन्य कामांचा समावेश असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
वर्धा नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालेले आहे. या इमारत बांधकामाचे दोन कोटी रुपयेही इतरत्र वळते केल्यामुळे इमारतीचे बांधकाम रखडल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला.
नगर विकास विभागाकडून निधी आला म्हणून तो निधी पालिकेचाच आहे, असा गैरसमज संबंधितांनी करुन घेतलेला दिसतो. वैशिट्यपूर्ण आणि विशेष रस्ता अनुदान हे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होते. या निधीतून कोणती कामे घ्यावी, ही सूचविण्याचे अधिकारी आपल्याला आहे. सदर निधी ज्या कामांसाठी आलेला आहे तो त्याच कामांवर खर्च केला जाणार आहे. या निधीतून पालिकेने राष्ट्रध्वज उभारण्याचा निर्णय घेतला. वास्तविक, या निधीतून राष्ट्रध्वज उभारावा, असे कुठलेही पत्र शासनाकडून आलेले असेल तर दाखवावे. आपण प्राधान्याने राष्ट्रध्वज उभारणीला महत्त्व देवू. नगर पालिकेने त्यांना नियमित येणाऱ्या निधीतून त्यांनी मंजूर केलेली कामे करावी, याला कुणाचीही हरकत नसावी.
- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.