हिवऱ्यात पट्टेदार वाघिणीची दहशत
By Admin | Updated: May 10, 2015 01:31 IST2015-05-10T01:31:58+5:302015-05-10T01:31:58+5:30
हिवरा येथे पट्टेदार वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचे वास्तव्य असल्याच्या चर्चेने गावात चांगलीच दहशत पसरली आहे.

हिवऱ्यात पट्टेदार वाघिणीची दहशत
सेवाग्राम : हिवरा येथे पट्टेदार वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचे वास्तव्य असल्याच्या चर्चेने गावात चांगलीच दहशत पसरली आहे. या वाघिण व तिच्या दोन बछड्यांनी बकरीवर हल्ला केला़ यात एक बकरी ठार झाली, तर दुसरी जखमी झाली़ ही घटना शनिवारी सकाळी उघड झाली.
याची माहिती येथील ग्रामसेवकाला देण्यात आली. त्यांनी वाघाची माहिती वनक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या माहितीवरून वनक्षेत्र अधिकारी त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर पिंजून काढला तरी त्यांना वाघाचे दर्शन झाले नाही वा पगमार्कही मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे.
हमदापूर येथून सहा कि़मी़ अंतरावर असलेल्या हिवरा गावाजवळून बोर नदी वाहते आणि मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. याच ठिकाणी गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे़ शुक्रवारी सायंकाळी चंद्रकात देशमुख यांच्या बकऱ्या शेताकडे आणि विहिरीकडे असताना पट्टेदार वाघिणीने बकऱ्यांवर हल्ला केला़ ही घटना प्रत्यक्ष गौतम कोसरे यांनी पाहिली. वाघिण आणि तिच्या सोबत दोन बछड्यांना पाहून ते घाबरले़ नंतर वाघिण व बछडे विहिरीकडे निघून गेले़ शनिवारी सकाळी याच विहिरीजवळ कमलेश उईकेला वाघिण व तिच्या बछड्यांचे दर्शन झाल्याची माहिती आहे.
देऊळगाव, नांद्रा व हिवरा या तीन गावांजवळून बोर नदी वाहते़ येथे झुडपांनी संपूर्ण भाग वेढून गेल्याने वाघांसाठी सुरक्षित जागा झाली आहे. जवळपास एक कि़मी़ अंतरावर शेतात मेंढ्या व बकऱ्यांचे कळप आहे़ शेतकऱ्यांच्या बकऱ्या व जनावरे नदीकाठावर चरायला व पाणी प्यायला जातात़ वाघिणीच्या दर्शनाने या भागातील तिनही गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे नदी काठाजवळील शेतकरी मात्र कमालीचे अस्वस्थ झाल्याची माहिती हिवऱ्याचे लोमेश देशमुख, नांद्राचे सरपंच संदीप लांबट, मोहन शेगोकार यांनी दिली. (वताहर)