झाडे होताहेत आगीत स्वाहा
By Admin | Updated: June 4, 2016 01:52 IST2016-06-04T01:52:29+5:302016-06-04T01:52:29+5:30
सध्या उन्हाळवाहीची कामे सुरू आहेत़ यात शेतकरी शेतातील कचरा गोळा करून तो पेटवून देतात़ शिवाय धुऱ्यावर वाढलेले तणही पेटविले जाते़ ...

झाडे होताहेत आगीत स्वाहा
जिल्ह्यात सर्वत्र हाच प्रकार : धुरे जाळताना झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी
वायगाव (नि.) : सध्या उन्हाळवाहीची कामे सुरू आहेत़ यात शेतकरी शेतातील कचरा गोळा करून तो पेटवून देतात़ शिवाय धुऱ्यावर वाढलेले तणही पेटविले जाते़ यात शेतातील तसेच लगतची झाडेही आगीच्या स्वाधीन केली जात असल्याचे दिसते़ हा प्रकार सध्या वायगाव मार्गावरच नव्हे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे. यामुळे मोठमोठी झाडे आगीच्या भक्षस्थानी येत आहेत.
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा तुकाराम महाराजांचा अभंग मानवाच्या जीवनातील झाडांचे महत्त्व सांगून जातो़ शासनालाही वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व कळले आहे़ यामुळेच वृक्ष लागवडीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे; पण या बाबी अद्याप शेतकऱ्यांना अवगत झाल्याचे दिसत नाही़ आजही पूर्वीप्रमाणेच शेतकरी शेतातील कचरा शेतातच जाळतात़ शिवाय धुऱ्यांनाही आग लावल्या जाते. यामुळे शेताच्या शेजारी व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची राखरांगोळी होताना दिसते़ काही लाकूड चोरही याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसते़ अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना आगी लावल्या जातात़ ही वृक्षे जमिनीवर कोसळली की, ते लाकून चोरून नेले जाते़ या प्रकारामुळे वृक्षांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसते़
वायगाव मार्गावरील अनेक शेतांचे धुरे दररोज पेटविले जात असल्याचे दिसते़ यात धुऱ्यावरील वृक्ष जळत असल्याने ते जमिनीवर कोसळत आहेत़ शेतकऱ्यांनी ही बाब लक्षात घेऊन धुरे पेटविणे बंद करणे गरजेचे आहे़(वार्ताहर)
वृक्षसंवर्धनाची गरज
रस्त्याच्या दुतर्फा, शेताच्या बांधावर पूर्वी झाडे लावली जात होती़ यात आंबा, चिंच, बिहाडा आदी झाडे दिसून येत होती़ माकडांचे कळप याच झाडांवर आश्रय घेत असल्याने पिकांची नासाडी होत होती़
हा मनस्ताप दूर करण्यासाठीही शेतकरी ही झाडे कापत असल्याचे दिसते़ अनेक मार्गांवरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे कधी जाळली गेली तर कधी कापली़ शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारी बाभूळही आता दिसत नाही़ यामुळे रोड व शेती उजाड झाली़ अनेक मोठी वृक्षेही कोसळण्याच्या मार्गावर आहे़ या वृक्षांचे संवर्धन करणेच गरजेचे झाले आहे़ या काही वर्षात रस्त्याच्या काठावर असलेली हजारो झाडे जळाली आहेत. या तुलनेत वृक्ष लागवड न झाल्याने पर्यावरणास धोका निर्माण झाला आहे.