गतिरोधक न दिसल्याने ट्रॅव्हल्स उलटली
By Admin | Updated: June 1, 2016 02:35 IST2016-06-01T02:35:50+5:302016-06-01T02:35:50+5:30
नागपूरकडून वर्धेकडे प्रवासी घेऊन येणारी ट्रॅव्हल्स रस्त्यावरील गतीरोधकामुळे अनियंत्रित होत ट्रॅव्हल्स उलटली.

गतिरोधक न दिसल्याने ट्रॅव्हल्स उलटली
वाहक ठार : ५० प्रवासी जखमी
सेलू : नागपूरकडून वर्धेकडे प्रवासी घेऊन येणारी ट्रॅव्हल्स रस्त्यावरील गतीरोधकामुळे अनियंत्रित होत ट्रॅव्हल्स उलटली. यात ट्रॅव्हल्सखाली दबून वाहक ठार झाल्याची माहिती आहे. तर सुमारे ५० ते ६० प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी ट्रॅव्हल्सला सरळ करून जखमींना रुग्णालयात हलविले. हा अपघात सोमवारी रात्री धडला. ठार झालेल्या वाहकाचे नाव अैनूर पठाण रा. धपकी असल्याचे समजले.
मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.३२ क्यू २४० ही ट्रॅव्हल्स नागपूर येथून प्रवासी घेऊन वर्ध्याकडे येण्यास निघाली. सुमारे ९ वाजताच्या सुमारास केळझर येथे पोहोचली. दरम्यान, केळझरनजीकच्या टोलनाक्याजवळील गतिरोधक ट्रॅव्हल्स चालकाला दिसले नसल्याने गतिरोधकाहून ट्रॅव्हल्स उसळली आणि रस्त्यावरच उलटली. ट्रॅव्हल्समधील वाहक दरवाजावर उभा होता. त्याचा दबून मृत्यू झाला. सर्वच आरडा ओरडा सुरू झाली. वाचवा वाचवा म्हणून हंबरडे फोडू लागले. अचानक ट्रॅव्हल्स उलटल्याने प्रवासी दबले गेले. यामध्ये ट्रॅव्हल्सचा वाहक अैनूर पठाण याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अपघातस्थळी क्रेनला पाचावरण करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने उलटलेल्या ट्रॅव्हल्सला सरळ करून जखमींना रुग्णालयात पाठविले.
अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी अपघातस्थळी केळझरचे तंटामुक्ती अध्यक्ष बाबाराव नरड, बबन वरडकर, गणेश तडस, डॉ. इरशाद शेख, इमरान शेख, ईशाद शेख, अैफाद शेख यांनी जखमींना बाहरे काढण्यात मदत केली.(तालुका प्रतिनिधी)