परिवहन महामंडळाला पडला सेवेचा विसर
By Admin | Updated: August 12, 2016 01:37 IST2016-08-12T01:37:15+5:302016-08-12T01:37:15+5:30
प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदवाक्याचा वापर करीत राज्यातील गावागावातील पोहचलेल्या बससेवेला प्रवाश्यांच्याव सेवेचा विसर पडल्याचे

परिवहन महामंडळाला पडला सेवेचा विसर
विद्यार्थ्यांची तारांबळ : चार तास प्रतीक्षा तरीही बसचा ठावठिकाणा नाही
बोरधरण : प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रिदवाक्याचा वापर करीत राज्यातील गावागावातील पोहचलेल्या बससेवेला प्रवाश्यांच्याव सेवेचा विसर पडल्याचे सेलू येथे दिसून आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या या अनागोंदीचा फटका शाळकरी मुलांना बसला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत बस आली नसल्याने बसच्या प्रतीक्षेत या विद्यार्थ्यांना सेलू बसस्थानकावर ताटकळत राहावे लागले.
या प्रकाराची माहिती भाजपाच्या सेलू शहराचे अध्यक्ष वरूण दप्तरी यांना मिळताच त्यांनी बसस्थानकाकडे धाव घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अल्पोपहाराची सुविधा उपलब्ध करीत परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करून या विद्यार्थ्यांना त्यांचे घर गाठण्याची सोय करून दिली. शिवाय या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणीही या विद्यार्थ्यांच्या पालकांसह सेलूतील नागरिकांनी केली आहे.
बोरधरण येथील विद्यार्थी शिक्षणासाठी सेलू येथे येतात. शाळा सुटल्यानंतर हिंगणीकडे जाणारी बोरधरण-आमगाव बस सेलू बसस्थानकावरून सायंकाळी ५ वाजता सुटते. या बसने विद्यार्थी आपल्या गावी जातात; पण बुधवारी ही बस सेलू बसस्थानकावर आली नाही. आता येईल मग येईल, अशी अशा करीत विद्यार्थी बसस्थानकावर थांबले; मात्र बसचा पत्ता नाही. बसस्थानकावर विद्यार्थी असताना नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७ वाजता कार्यालय बंद करून बसस्थानक सोडले. विद्यार्थी ज्या बसची प्रतीक्षा करीत होते ती बस कधी येणार हे सांगितले नाही. एवढेच नाही तर त्यांच्याकडून साधे सौजन्यही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले नाही. बसस्थानकावर नियोजित वेळेत बस आली नाही तेव्हा प्रयत्न करण्याची गरज होती, तसेही त्यांनी केले नाही. रात्रीचे आठ वाजल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. अश्यातच सेलू शहर भाजपा अध्यक्ष वरूण दप्तरी यांना एका पालकाने दुरध्वनीवर झालेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांनी बसस्थानक गाठत वर्धा येथील आगार प्रमुखांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना सेवेचा पडलेल्या विसराची आठवण करून दिल्यानंतर रात्री ८.४५ वाजता बसस्थानकावर बस पोहोचली. रात्री उशिरा विद्यार्थी आपल्या स्वगृही परतले.